
आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याची मागणी इतकी वाढली आहे की, ‘ओपनएआय’च्या ChatGPT ला दररोज किती प्रश्न विचारले जात असतील, याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. ‘ॲक्सिओस’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ChatGPT आता एक मोठा टप्पा गाठला असून, ते दररोज 2.5 अब्ज प्रॉम्प्ट्स (प्रश्न) प्रोसेस करत आहे! यापैकी सुमारे 33 कोटी प्रश्न एकट्या अमेरिकेतून येतात, जे हे सिद्ध करते की ChatGPT आता जागतिक स्तरावर लोकांच्या डिजिटल जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे.
गुगल आणि ChatGPT ची स्पर्धा:
जर याची तुलना गुगलसोबत केली, तर गुगल अजूनही जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गुगल दररोज 14 अब्ज ते 16 अब्ज सर्च प्रश्नांना हाताळते. ‘अल्फाबेट’च्या आकडेवारीनुसार, गुगलवर वार्षिक सुमारे 5 ट्रिलियन सर्च होतात, म्हणजे दररोज सुमारे 13.7 अब्ज सर्च. स्वतंत्र संशोधकांचे मानणे आहे की, हा आकडा दररोज 16.4 अब्ज सर्चपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच, ChatGPT अजूनही गुगलच्या मागे आहे, परंतु त्याची वाढ अत्यंत वेगाने होत आहे. ‘ओपनएआय’चे सीईओ (CEO) सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी डिसेंबर 2024 मध्ये सांगितले होते की, ChatGPT वर दररोज 1 अब्ज प्रश्न येत होते. याचा अर्थ, केवळ 8 महिन्यांत हा आकडा दुप्पट झाला आहे! हे एआयची वाढती लोकप्रियता आणि त्याची प्रचंड मागणी दर्शवते.
ChatGPT इतका लोकप्रिय का होत आहे?
ChatGPT च्या वेगाने वाढत्या लोकप्रियतेचे मोठे कारण म्हणजे त्याचे GPT-4o मॉडेल. हे मॉडेल उत्तम कार्यक्षमता आणि नैसर्गिक संवादाचा (Natural Conversation) अनुभव देते. याशिवाय, ‘ओपनएआय’ने ChatGPT ला वेब ब्राउझर्स, मोबाईल ॲप्स आणि ‘प्रॉडक्टिव्हिटी टूल्स’मध्ये समाविष्ट करून लोकांच्या दैनंदिन गरजांशी जोडले आहे.
लोक ChatGPT चा वापर केवळ ‘सर्च’ करण्यासाठी करत नाहीत, तर कल्पनांवर विचार , आशय निर्मिती , समस्या सोडवणे आणि कोडिंगसाठीही करत आहेत. या आकड्यांवरून हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, येत्या काळात इंटरनेटवर विचारले जाणारे अब्जावधी प्रश्न ‘सर्च बार’मध्ये नव्हे, तर ‘चॅटबॉक्स‘मध्ये (Chatbox) विचारले जातील. याचा अर्थ, एआय चॅटबॉट्स आणि सर्च इंजिन यांच्यातील स्पर्धा आणखी रोमांचक होऊ शकते. भविष्यात डेटा शोधण्याच्या आणि माहिती मिळवण्याच्या पद्धतींमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.