
भारतीय रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेपो दरात कपात केल्यानंतर आपल्या देशातील सर्वात मोठी सर्वाजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एसबीआय बँकेने होम लोनसह विविध कर्जांवरील व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे.
तर बँकेने कर्जाचा व्याजदर 25 बेसिस पॉइंटने कमी केले आहेत. यामुळे विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी कर्ज घेणे स्वस्त झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या सर्वात मोठ्या बँकेने कर्जाच्या दरात कपात केल्यानंतर SBI चा एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड रेट (EBLR) 7.90% टक्क्यांपर्यंत घसरला आहे. नवीनतम कपातीनंतर सुधारित दर आजपासून 15 डिसेंबर 2025 पासून लागू झाले आहेत. आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने RBI च्या चलनविषयक धोरण समितीने या वर्षी चौथ्यांदा रेपो दरात 25 बेसिस पॉइंटने कपात केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसबीआयने सर्व कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 5 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. या कपातीनंतर एक वर्षाचा एमसीएलआर 8.75% टक्क्यांवरून 8.70 % टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त, बँकेने त्याचा बेस रेट/बीपीएलआर 10 टक्क्यांवरून 9.90 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. हे दर आजपासून लागू झाले आहेत.
कालावधी जुना एमसीएलआर नवीन एमसीएलआर
ओव्हरनाईट 7.90% 7.85%
1 महिना 7.90% 7.85%
3 महिने 8.30% 8.25%
6 महिने 8.65% 8.60%
1 वर्ष 8.75% 8.70%
2वर्षे 8.75% 8.70%
3वर्षे 8.85% 8.80%
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने व्याजदरांमध्ये कपात केल्यानंतर मुदत ठेवीच्या व्याजदरातही बदल केले आहेत. मुदत ठेवींबाबत बँकेने दोन वर्षांपेक्षा कमी आणि तीन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 5 बेसिस पॉइंट्सने कमी करून 6.40% टक्के केला आहे. याव्यतिरिक्त विशेष 444 दिवसांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदर, अमृत वर्षा, 15 डिसेंबरपासून 6.60% टक्क्यांवरून 6.45% टक्के करण्यात आला आहे. इतर मॅच्युरिटी मुदत ठेव योजनांसाठीचे दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीये.
एफडी दर
ठेवीचा कालावधी | सर्वसामान्यांसाठी व्याजदर | ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर
7 ते 45 दिवस | 3.05% | 3.55%
46 ते 179 दिवस | 4.90% | 5.40%
180 ते 210 दिवस | 5.65% | 6.15%
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी| 5.90% | 6.40%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी |6.25% |6.75%
2 ते 3 वर्षे कालावधी |6.40% |6.90%
3 ते 5 वर्षांपेक्षा कमी |6.30% |6.80%
5 ते 10 वर्षे | 6.05% |7.05%
व्याजदर कपातीनंतर कोणाला होणार फायदा?
या दर कपातीचा थेट फायदा कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. जसं की पर्सनल लोन, गृहकर्ज आणि वाहनकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता कमी व्याज भरावं लागेल. म्हणजेचं आता कर्जाचा ईएमआय कमी होईल.