YouTube Income: युट्यूबर बनायचा विचार करताय? जाणून घ्या 5000 व्ह्यूजला किती पैसे मिळतात
आजकाल अनेकजण यूट्यूब चॅनेल सुरु करुन वेगवेगळे व्हिडीओ तयार करताना दिसतात. कधी कधी त्यांचे हे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की त्यांना या व्हिडीओच्या व्ह्यूजचे पैसे मिळत आहेत. चला जाणून घेऊया 5000 व्ह्यूज मिळाल्यानंतर किती पैसे मिळतात.

आजचे सोशल मीडियाचे जग असल्याचे म्हटले जाते. अनेकजण यूट्यूब अकाऊंट उघडतात आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करतात. जसे जसे व्हिडीओ व्हायरल होऊ लागतात तसे तसे कमाईचा आकडा वाढत जातो. अनेकांना प्रश्न पडतो की जर यूट्यूबवर एका व्हिडीओला जर 5000 व्ह्यूज आले तर किती कमाई होऊ शकते? चला जाणून घेऊया या विषयी सविस्तर…
लोक यूट्यूबवरून खूप कमाई करत आहेत. काही दिवसांपूर्वी एका अहवालात सांगण्यात आले होते की, भारतातून चालवले जाणारा एक यूट्यूब चॅनेल एआयच्या मदतीने व्हिडीओ बनवून वार्षिक ३८ कोटी रुपये कमावत आहे. तुम्हीही यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करून पैसे कमावू शकता. विशेष बाब अशी आहे की, यूट्यूब प्रत्येक सिंगल व्ह्यूसाठी क्रिएटरला पैसे देते. मात्र, यासाठी अनेक नियम आहेत, ज्यांची माहिती क्रिएटरला असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमच्या व्हिडीओवर 5000 व्ह्यूज आल्यावर तुमची किती कमाई होऊ शकते.
यूट्यूबवरून कमाई कशी होते?
यूट्यूबच्या पे-पर-व्ह्यू सिस्टिमद्वारे क्रिएटरची कमाई होते. मात्र, नावाप्रमाणे जितके सोपे वाटते, तितके ते नाही. खरे तर, यूट्यूब तुमच्या व्हिडीओजवर आलेल्या व्ह्यूजसाठी नव्हे, तर व्हिडीओवर चालणाऱ्या जाहिरातींना मिळालेल्या व्ह्यूजच्या आधारावर पैसे देते. याचा अर्थ असा की, समजा तुमच्या व्हिडीओवर १०,००० व्ह्यूज आले आहेत, पण त्यावर कोणतीही जाहिरात नाही, तर तुमची कमाई होणार नाही. तर दुसरीकडे, जर तुमच्या व्हिडीओवर चालणाऱ्या जाहिरातीला ५,००० व्ह्यूज मिळाले असतील, तर फक्त त्या ५,००० व्ह्यूजचे पैसे तुम्हाला मिळतील.
व्हिडीओवर व्ह्यूजच्या आधारावर किती पैसे मिळतात?
व्हिडीओवर व्ह्यूज आल्याने किती कमाई होईल, याचे कोणतेही निश्चित उत्तर नाही. जर तुम्ही यूट्यूबचे सर्व नियम पाळले तर सबस्क्राइबर्स, व्हिडीओचा रीच, प्रेक्षकवर्ग आणि एंगेजमेंटच्या आधारावर तुमची कमाई ठरते. तरीही अंदाज बांधला जातो की, ५,००० व्ह्यूज आल्यावर २५ ते ७५ डॉलरपर्यंत कमाई होऊ शकते.
यूट्यूबवरून या पद्धतींनीही कमाई करता येते
तुम्ही यूट्यूबवर फक्त व्हिडीओ पोस्ट करूनच कमाई करू शकत नाही, तर कमाईचे अनेक इतर मार्गही आहेत. तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सामील होऊन यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन फी, चॅनेल मेंबरशिप, मर्चेंडाइज इत्यादींमधून पैसे कमावू शकता. त्याचप्रमाणे चॅनेल मेंबरशिप, स्पॉन्सर्ड कंटेंट आणि अॅफिलिएट मार्केटिंग इत्यादी माध्यमांद्वारेही कमाई करता येते.
