2.35 कोटी रुपये, अन् हिरेजडित मुकुट… ‘मिस युनिव्हर्स 2026 ‘ची विजेती जेनिफरला बक्षीस म्हणून काय काय मिळणार आहे?
Miss Universe 2026: पोर्तो रिकोच्या जेनिफरने 'मिस युनिव्हर्स २०२६'चा किताब पटकावला. तिला छानसा हिरेजडित मुकुट आणि फुलांचा बुके तर मिळाला आहे पण यासोबत तिला 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतील विजेतीला म्हणून काय काय मिळते, ते जाणून घ्या.

पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने ७५ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला. तिने जगभरातील अनेक सौंदर्यवतींना मागे टाकत किताब पटकावला. २७ वर्षीय जेनिफर ही या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिली विवाहित महिला आणि माता ठरली आहे. तिने हा किताब पटकावल्यावर तिला तिला मागील विजेती, मेक्सिकोची फातिमा बॉश हिच्या हस्ते मुकुट घालण्यात आला.याशिवाय तिला छानसा फुलांचा बुके देण्यात आला. पोर्तो रिकोचा हा सहावा विजय असून, सुमारे २० वर्षांनंतर या देशाला पुन्हा एकदा हा किताब मिळाला आहे. भारताची केझिया लिझ मात्र पहिल्या १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवू शकली नाही. ‘मिस युनिव्हर्स’चे विजेतेपद मिळाल्यावर मुकुटासोबतच रोख बक्षीस आणि इतर अनेक फायदेही मिळतात. नेमकं तिला काय काय मिळणार आहे याबद्दल जाणून घ्या.
‘मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन’ (MUO) आपल्या बक्षीस पॅकेजचे मूल्य अधिकृतपणे जाहीर करत नाही, परंतु प्रसारमाध्यमांमधील अहवालांमध्ये, यापूर्वीच्या विजेत्यांना मिळालेल्या रकमेच्या आधारे काही दावे करण्यात आले आहेत.
विजेतीला किती मिळते बक्षीस रक्कम?
मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन (MUO) आपल्या आर्थिक व्यवहारांची अधिकृत माहिती सार्वजनिक करत नाही. मात्र, गेल्या वर्षीच्या विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या स्पर्धकाला साधारण 2.35 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळते. याशिवाय, विजेतीला वर्षभराच्या कार्यकाळात दरमहा जवळपास 50 हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 47 लाख रुपये दिले जात असल्याची माहिती आहे.
मात्र, ही रक्कम म्हणजे थेट वैयक्तिक पगार नाही. विजेतीला जागतिक स्तरावर संस्थेची प्रतिनिधी म्हणून काम करावं लागतं. या काळात विविध देशांमधील दौरे, मुलाखती, कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची जबाबदारी तिच्यावर असते. त्यामुळे मिळणाऱ्या मासिक रकमेचा मोठा भाग या कामांसाठीच खर्च होतो.
आलिशान घरापासून ते स्टायलिस्टपर्यंत, मिळतात या खास सुविधा!
मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर विजेतीचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. आर्थिक बक्षिसासोबतच तिला अनेक प्रीमियम सुविधा दिल्या जातात. न्यूयॉर्कमध्ये आलिशान निवास: विजेतीच्या राहण्याची व्यवस्था न्यूयॉर्कमधील एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये केली जाते. विशेष म्हणजे, मिस यूएसएसोबत तिला रूम शेअर करावी लागते.
पर्सनल स्टायलिस्ट आणि ब्युटी टीम: तिच्या लूकची विशेष काळजी घेण्यासाठी पर्सनल स्टायलिस्ट, हेअरस्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्टची टीम उपलब्ध असते. यासोबतच सौंदर्य आणि आरोग्याशी संबंधित सुविधाही दिल्या जातात.
खास कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी: न्यूयॉर्कमधील मोठे इव्हेंट्स, चित्रपटांचे प्रीमियर, ब्रॉडवे शो आणि विविध लॉन्च पार्ट्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
प्रवास आणि इतर सुविधा: वर्षभरातील अधिकृत दौरे आणि कार्यक्रमांसाठी प्रवासाची व्यवस्था केली जाते.
कोट्यवधींचा मुकुटही असतो आकर्षणाचा केंद्रबिंदू!
मिस युनिव्हर्सच्या मुकुटाचीही जगभरात विशेष चर्चा असते. यंदाची विजेती ‘रेडियन्स ऑफ एन इटरनल लेगेसी’ (Radiance of an Eternal Legacy) हा 75व्या वर्धापनदिनानिमित्त तयार करण्यात आलेला मुकुट परिधान करणारी पहिली सौंदर्यवती ठरली आहे. याआधीच्या वर्षातील मुकुटाची किंमत जवळपास 50 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 47 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हा मुकुट विजेतीला कायमस्वरूपी मिळत नाही. तिच्या संपूर्ण कार्यकाळात अधिकृत कार्यक्रमांमध्ये तो परिधान केला जातो आणि पुढील वर्षी नव्या विजेतीकडे तो सुपूर्द केला जातो.
वर्षभर जागतिक स्तरावर करावं लागतं प्रतिनिधित्व
मिस युनिव्हर्सचा किताब मिळाल्यानंतर विजेतीला वर्षभर संस्थेची प्रमुख जागतिक प्रतिनिधी म्हणून काम करावं लागतं. विविध देशांमध्ये प्रवास करून मीडिया मुलाखती देणं, प्रायोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणं आणि सामाजिक तसेच सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभाग घेणं, अशा अनेक जबाबदाऱ्या तिला पार पाडाव्या लागतात. त्यामुळे या पदासोबत मिळणाऱ्या आर्थिक पॅकेजमधील मोठा हिस्सा प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि अधिकृत कामांवर खर्च होतो.
खऱ्या कमाईची सुरुवात किताब जिंकल्यानंतर!
मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणं म्हणजे केवळ बक्षीस रक्कम मिळवणं नव्हे, तर आंतरराष्ट्रीय मनोरंजन आणि फॅशन विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी असते. या विजेतेपदामुळे नामांकित फॅशन, ब्युटी आणि लाइफस्टाइल ब्रँड्ससोबत काम करण्याचे मार्ग खुले होतात. ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिरातींचं मानधन सहसा सार्वजनिक केलं जात नाही. मात्र, मिस युनिव्हर्सचा किताब मिळाल्यानंतर वाढणारी जागतिक लोकप्रियता भविष्यातील कमाईसाठी मोठी संधी ठरू शकते. त्यामुळे या मुकुटाची खरी किंमत केवळ बक्षीस रकमेत नसून, त्यातून उघडणाऱ्या करिअरच्या असंख्य संधींमध्ये दडलेली आहे!
