
तुम्ही कधी नारंगी रंगाचा शार्क मासा (Orange Shark) पाहिली आहे का? ऐकायला विचित्र वाटलं तरी, जगातील एका सुमद्र किनारपट्टीवर हा शार्क मासा आढळला आहे. या शार्क माशाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. कारण आजवर आपण पाहिलेल्या शार्कचा रंग आणि या शार्कचा रंग हा पूर्णपणे वेगळा आहे. या नारंगी शार्कचे फोटो पाहून शास्त्रज्ञदेखील चकीत झाले आहेत. अनेकांना प्रश्न पडला आहे की हा भगव्या रंगाचा शार्क मासा नेमका कुठे सापडला आहे? चला जाणून घेऊया…
अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘मरीन बायोलॉजी जर्नल’ या विज्ञान मासिकाच्या अहवालानुसार, नारंगी रंगाची ही पहिली शार्क ऑगस्ट २०२४ मध्ये कोस्टा रिकाच्या टॉर्टुग्वेरो नॅशनल पार्कमध्ये दिसली होती. तेव्हा काही मच्छीमारांनी समुद्राच्या ३७ मीटर खोलीत या नारंगी शार्कला पाहिले होते, जी सामान्य शार्कपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. तिचे डोळे पांढरे होते आणि शरीर चमकदार नारंगी रंगाचे होते. मच्छीमारांनी तातडीने शार्कची छायाचित्रे काढली आणि नंतर तिला पुन्हा पाण्यात सोडले.
वाचा: Viral Video: अमेरिकेत एका पारलेजी बिस्कीटाची किंमत किती? ऐकून बसेल धक्का
लोकांनी तिला ‘गोल्डफिश’ शार्क म्हणायला सुरुवात केली
नंतर जेव्हा या दुर्मिळ नारंगी शार्कची छायाचित्रे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर केली गेली, तेव्हा ती झटपट व्हायरल झाली. नेटकऱ्यांना ती पाहून आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी तिला ‘गोल्डफिश’ शार्क असे नाव देण्यास सुरुवात केली.
या अनोख्या रंगामागचे रहस्य काय आहे?
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या शार्कचा हा खास रंग दोन अत्यंत दुर्मिळ अनुवांशिक परिस्थितींमुळे आहे. पहिली म्हणजे अल्बिनिझम (Albinism), ज्यामुळे प्राण्याची त्वचा आणि डोळ्यांचा रंग हलका होतो. दुसरी म्हणजे झँथिझम (Xanthism), ज्यामुळे प्राण्याची त्वचा किंवा खवले पिवळ्या-नारंगी रंगाचे दिसतात. संशोधकांच्या मते, या दोन्ही अनुवांशिक परिस्थितींमुळे शार्कच्या शरीरात मेलॅनिनचे उत्पादन योग्य प्रकारे होऊ शकले नाही, आणि यामुळेच तिच्या शरीराचा रंग तपकिरी किंवा निळ्या ऐवजी चमकदार नारंगी झाला. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ही एक सामान्य नर शार्क होती, फक्त तिचा रंग अनोखा आहे. पण हा रंग तिच्यासाठी धोकादायकही ठरू शकतो, कारण समुद्राच्या खोलवर हा चमकदार रंग शिकारी प्राण्यांना सहजपणे आकर्षित करू शकतो.