
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. दोन्ही शेजारील देशांमधील वाद हा जगजाहीर आहे. जेव्हा या दोन्ही देशांमध्ये एखाद्या खेळाचा सामाना असतो तेव्हा तो एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतो. प्रेक्षकांचा उत्साह, स्टेडियममधील वातावरण आणि टीव्हीसमोर बसलेली गर्दी, सगळं काही एकदम वेगळ्याच स्तरावर पोहोचलेलं असतं. अशा परिस्थितीत जर कोणी भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्ल्यांमधून फिरलं तर काय होईल? ऐकायला तुम्हाला हे थोडं विचित्र वाटत असेल, पण असच काहीसं घडलं आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्लॉगरला जाणून घ्यायचं होतं की जर तो पाकिस्तानच्या रस्त्यांवर भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून फिरला तर तिथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील? मजेशीर गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ नवा नाही. काल झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला व्लॉगर कॅमेऱ्यासमोर उभा राहून म्हणतो की, जर मी भारतीय जर्सी घालून लाहोरच्या रस्त्यांवर फिरलो तर काय होईल? त्यानंतर तो खरोखर निळी जर्सी घालून बाहेर पडतो आणि शहरातील गल्ल्यांमधून फिरायला लागतो. सुरुवातीला रस्त्यावरून जाणारे लोक त्याला पाहून थोडे आश्चर्यचकित होतात आणि काही वेळ पाहात बसतात. काहीजण नजरेने प्रश्न विचारतात, पण हळूहळू जेव्हा तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो, तेव्हा प्रतिक्रिया हलक्या-फुलक्या आणि मजेशीर येतात. विशेष म्हणजे कोणीही त्याला थांबवून काही उलट-सुलट बोललं नाही. उलट, जेव्हा तो समोरून जाणाऱ्या लोकांना नमस्ते म्हणतो तेव्हा लोकही हसत हसत उत्तर देतात किंवा हात मिळवतात.
व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @alexwandersyt या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओसोबत पाकिस्तानमध्ये भारतीय क्रिकेटची जर्सी घालणे सुरक्षित आहे का? असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 कोटी 28 लाखांहून अधिक व्ह्यूज, 3 लाख 80 हजारांहून अधिक लाइक्स आणि 16 हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत आणि लोक यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, टी-शर्टवर भारत इंग्रजीत लिहिले आहे, कदाचित अनेकांनी ते वाचलेच नाही. दुसऱ्याने मजेत म्हटले की, अर्ध्या लोकांना तर माहीतच नसेल की टी-शर्टवर काय लिहिले आहे. आणखी एकाने लिहिले की, तुमच्या चेहऱ्याने तुम्हाला वाचवले.