
शेतकरी आणि पाळीव प्राण्याचे प्रेम जगजाहीर आहे. एका दूध व्यावसायिकाने सर्वात महागडी म्हैस खरेदी केली आणि तिची अख्ख्या गावात बँडबाजाच्या तालावर मिरवणूकच काढली. या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याच्या या महागड्या म्हशीला पाहाण्यासाठी पंचक्रोशी जमा झाली होती. म्हशीच्या डोक्याला पगडी बांधली होती आणि तिच्या सर्वांगावर गुलाल उधळला होता. शेतकऱ्याचे हे प्रेम आणि म्हशीची चर्चा सर्वत्र आता सुरु आहे.
उज्जैनहून सुमारे २५ किलोमीटरवर असलेल्या पंथ पिपलई गावातील दूधाचा व्यवसाय करणारे शेतकरी आणि त्याच्या मित्रांना म्हैस आणल्याचा इतका आनंद झाला की त्यांनी तिची अक्षरश: गावातून वाजत गाजत वरातच काढली. या म्हशीची किंमत ऐकून तुम्हाला घामच फुटेल. परंतू हौसेला मोल नसते अशी गत म्हणायची…
इंदूर रोड स्थित गाव पंथ पिपलई येथे राहणारे राजेश जाट आणि माजी सरपंच राजेंद्र जाट यांचे स्वप्न महागडी म्हैस खरेदी करण्याचे आणि तिची अख्ख्या गावातून मिरवणूक काढण्याचे होते. राजेश यांच्याकडे आधीच १० म्हशी आहेत ,राजेंद्र जाट आणि राजेश जाट यांनी दीड लाख रुपयांची मारवाडी मुर्रा जातीची सर्वात महागडी म्हैस विकत घेतली. आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्र परिवाराला बोलावले आणि तिची मिरवणूकच काढली. येथील तेजाजी चौकातून तिची जंगी मिरवणूक निघाली.
मिरवणूकीत उत्सव मूर्ती म्हशीला फेटा बांधण्यात आला आणि तिच्यावर गुलाल उधळण्यात आला.राम मंदिर ते राजेट जाट यांच्या घरापर्यंत या म्हशीची मिरवणूक निघाली. या मिरवणूकीला पाहून गावकरी चकीत झाले. ढोल ताशे लग्नात किंवा धार्मिक सणात वाजवले जातात. परंतू म्हशीसाठी कोणी एवढी तसदी घेत नाही. यावरुन या शेतकऱ्याचे त्याच्या म्हशीबद्दलचे प्रेम दिसून येते.
राजेंद्र जाट आणि राजेश जाट दूधाचा व्यवसाय करतात. त्यांच्याजवळ १० हून अधिक मुर्रा म्हशी आहेत. गेल्यावर्षी देखील त्यांनी एक मुर्रा म्हैस खरेदी केली होती. परंतू अशा म्हशी गावात अन्य लोकांकडेही आहेत. या वर्षी त्यांनी दीड लाखाची महागडी म्हैस आणल्याने तिची जंगी मिरवणूक काढली. राजेश आणि राजेंद्र जाट यांना म्हशी पाळण्याची आवड आहे. दरवर्षी ते गावात बैलाची दंगल घडवतात. गावात म्हशी खरेदी करुन आणण्याचा आनंद केवळ राजेश आणि राजेंद्र यांनाच नव्हता तर त्यांच्या मित्रमंडळींना देखील होता. त्यांच्या आनंदात संपूर्ण गाव सामील झाला होता.