
अबू धाबी एअरपोर्टचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आफ्रिकी व्यक्ती दिसून येत आहे. त्याच्यासोबत काही महिला आहेत. हे सर्वजण एका खाजगी विमानातून उतरतात. विमानातून उतरल्यानंतर त्या व्यक्तीला सर्वजण मान झुकवून अभिवादन करताना दिसतात. ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्याचप्रमाणे इतक्या महागड्या विमानातून ती व्यक्त अर्धनग्नावस्थेत का फिरतेय, असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. तर इतक्या महिला आणि मुलांसोबत विमानातून येणारी ही व्यक्ती कोणी साधीसुधी नाहीये. तर ते आफ्रिकेच्या शेवटच्या निरपेक्ष राजेशाहीचे राजे आहेत. ही व्यक्ती इस्वातिनीचा (पूर्वीचं स्वाझीलँड) राजा मस्वाती- III आहे.
मस्वाती- III यांच्या अबू धाबी इथल्या विमानतळावरील आगमन सध्या जगभरात चर्चेत आहे. 10 जुलै रोजी राजा मस्वाती त्यांच्या प्रायव्हेट जेटने अरब अमिरातीत पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत 15 पत्नी, 30 मुलं आणि जवळपास 100 नोकर-चाकर होते. इतका मोठा ताफा पाहिल्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ झाला. सुरक्षारक्षकांना विमानतळावरील तीन टर्मिनल बंद करावे लागले. अचानक विमानतळावर एका प्रकारे लॉकडाऊनच लागला होता.
स्वाझीलँड हा आफ्रिकी देश आता इस्वातिनी नावाने ओळखला जातो. या देशाचे राजा आहेत मस्वाती III. त्यांच्या एक-दोन नव्हे तर 30 पत्नी आहेत. त्यांच्या वडिलांच्याही जवळपास 125 पत्नी होत्या. त्यांची 210 हून मुलं आणि 1000 हून अधिक नातवंडं आहेत.
राजा मस्वाती हे 1986 पासून राजपदावर आहेत. जगभरातील सर्वांत श्रीमंत राजांमध्ये त्यांचा उल्लेख आवर्जून होतो. त्यांची संपत्ती तब्बल 1 अब्ज डॉलरहून अधिक असल्याचं म्हटलं जातं. त्यांच्या 15 पत्नी आणि 35 हून अधिक मुलं आहेत. ते दरवर्षी ‘रीड डान्स’ समारंभात नव्या पत्नीची निवड करतात. परंतु त्यांचं वैभव पाहून त्यांच्या देशातील गरीबीवर प्रश्न उपस्थित केला जातो. इस्वातिनीमध्ये 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. सध्या त्यांच्या या व्हिडीओ सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. राजाने सोबत त्यांचं कुटुंब नाही तर संपूर्ण गावच आणल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.