Baba Vanga Prediction : शहरांना समुद्र गिळणार, पोटात गोळा आणणारे बाबा वेंगाचे काय ते भाकीत
Tsunami Prediction : जपानमधील या बाबा वेंगाच्या भविष्यवाणीची सध्या जगभरात चर्चा आहे. 5 जुलै रोजी 2025 नंतर जपानमध्ये समुद्राच्या लाटा उसळण्याचे भाकीत वर्तवले आहे. कोणी केले हे भाकीत, काय आहे त्याचा अर्थ?

जपानच्या मंगा आर्टिस्ट रिओ तात्सुकी या सध्या “नवीन बाबा वंगा” म्हणून ओळखल्या जात आहेत. त्यांच्या भयावह भाकीतामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. तात्सुकी यांनी भाकीत केलं आहे की 5 जुलै 2025 रोजी जपानवर प्रचंड आपत्ती कोसळेल. या इशार्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, हजारो पर्यटकांनी जपानच्या प्रवासाचे बुकिंग रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. तात्सुकी यांची याआधीची अनेक भविष्यवाण्या अचूक ठरल्यामुळे त्यांच्या नव्या भाकिताकडेही लोक गांभीर्याने पाहत आहेत.
पुस्तकातील भाकीत खरा ठरल्याचा दावा
रिओ तात्सुकी यांचे 1999 मध्ये “The Future I Saw” हे पुस्तक बाजारात आले होते. हे काॉमिक त्यावेळी कोणी गांभीर्याने घेतले नव्हते. हे पुस्तक मनोरंजक आणि फँटसी असल्याची टिप्पणी झाली होती. पण 2011 मध्ये जपानमध्ये त्सुनामी आली आणि रिओंच्या पुस्तकाची झपाट्याने विक्री झाली. या पुस्तकातील तारीख आणि तिने केलेले वर्णन तंतोतंत जुळल्याचे दावे पुढे आले. हे पुस्तक पुढे खूप गाजले.
आता सुधारीत आवृत्तीत काय दावा?
रिओ तात्सुकी हिच्या “The Future I Saw” या पुस्तकाची सुधारीत प्रत 2021 मध्ये आली. कोरोना काळात हे पुस्तक आणि त्यातील दावे लोकांनी उत्सुकतेने वाचले. त्यातील कोरोनाविषयीचे भाकीत खरं ठरल्याचा दावा करण्यात आला होता. जुलै 2025 मध्ये जपानमधील दक्षिण महासागरात मोठा ज्वालामुखी फुटेल. समुद्र खवळेल. समुद्रातून पाणी उसळेल. भयंकर त्सुनामी येईल असा दावा तिच्या पुस्तकात करण्यात आला आहे.
या ज्वालामुखीमुळे जपानचे दक्षिण द्वीप, तैवानचा किनारपट्टा, इंडोनेशियाचे काही भाग प्रभावित होतील. तात्सुकीचा दावा आहे की, 2011 मधील फुकुशिमा त्सुनामीपेक्षा पण ही त्सुनामी घातक असेल. यामध्ये हजारो लोकांना प्राण गमवावे लागतील. तर अनेक जण जायबंदी होतील असा दावा आहे.
पर्यटन व्यवसायाला मोठा फटका
जुलै 2025 मध्ये या त्सुनामीच्या इशार्यामुळे जपान, इंडोनेशिया आणि तैवान येथील पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका जपानच्या पर्यटनाला बसला आहे. पर्यटकांनी या देशातील यापूर्वी केलेले हॉटेल, विमान बुकिंग तात्काळ रद्द केले. तर काहींनी त्यांचा फिरण्याचा बेत पुढे ढकलला. सध्या आकडेवारीनुसार, 50 टक्क्यांहून अधिक पर्यटकांनी जपानपासून ते हाँगकाँगपर्यंत बुकिंग रद्द करण्यास प्राधान्य दिले आहे. पर्यटकांच्या मते रिओ तात्सुकीच्या भविष्यवाण्या यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे ते कोणताही धोका स्वीकारू शकत नाही. अर्थात विज्ञानाच्या कसोटीवर त्याला शास्त्रज्ञांनी दुजोरा दिलेला नाही.
जपानमधील मियागी शहराचे गव्हर्नर योशिहिरो मुराई यांनी लोकांना विनंती केली आहे की, त्यांनी भयभीत होण्याची गरज नाही. पर्यटकांनी बुकिंग रद्द न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. लोकांनी शांत राहावे, अशा अफवांवर आणि सोशल मीडियातील दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
डिस्क्लेमर : ही सर्वसामान्य माहिती आहे. शास्त्रज्ञांनी, हवामान तज्ज्ञांनी रिओच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. तिच्या पुस्तकात ही माहिती वर्तवण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही.
