गटारात हात घालताच सापडतं सोनं! देशातील या बाजारातल्या नाल्यावर उडते झुंबड
साधारणपणे गटारांपासून लोक दूर राहतात, पण बिहारमधील आरा येथील बाजारात गटारांमध्ये सोनं सापडते. दागिन्यांच्या कामातून निघणारे सोन्याचे बारीक कण कचरा व पाण्यासोबत नाल्यात जातात. देशभरातून लोक हा गाळ चिवडून सोनं शोधायला येतात. काहींसाठी हे उपजीविकेचं साधन आहे, ज्यात खूप मेहनत लागते.

साधारणपणे लोक नाल्या, गटारांपासून नेहमीच दूर राहतात. दुर्गंधी येत असल्याने लोक त्या दिशेने फिरकतही नाही. कारण काहींना नाल्यांजवळून गेल्यावर मळमळतं. कुणाचं डोकं भणभणतं. तर कुणाला थेट उलट्या होतात. त्यामुळे लोक नाल्यांपासून दूरच राहतात. पण देशातील असा एक बाजार आहे, जिथल्या गटारांमधील कचऱ्यात सोनं सापडतं. हे सोनं शोधण्यासाठी देशभरातून लोक या ठिकाणी येत असतात. दिवशभर या गटारात हात घालून शोध घेत असतात.
बिहारच्या आरा शहरातील गुजरी बाजार आणि जगजीवन मार्केटमध्ये सोन्या चादींचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. या बाजारातील असंख्य दुकानात शेकडो कारागिर आभूषणं बनवण्यापासून त्याची कटिंग करणं, त्या घासणं आणि पॉलिशिंग करण्याचं काम करतात. दागिने तयार करण्याच्या प्रक्रियेवेळी सोन्याचे अत्यंत छोटे कण निखळून जातात. हे कण इतके बारीक असतात की ते डोळ्यांनी दिसत नाहीत.
जेव्हा दुकानाची साफसफाई केली जाते तेव्हा सोन्याचे हे कण फरशीवर जमलेल्या धुळीत मिसळून जातात. दुकान पाण्याने धुतले जाते तेव्हा पाण्यासोबत हे कण वाहून नाल्यात जातात. तसेच दुकानातील हा कचरा नाल्यात टाकला जातो. तेव्हा हे सोन्याचे कणही कचऱ्यात जातात. त्यानंतर हे कण नाल्यातील गाळात चिटकून बसतात. त्यामुळे हे कण सापडणं सोपं होतं. त्यामुळे या नाल्या काही लोकांसाठी उपजिवीकेचं साधनच झालं आहे. ज्या नाल्यांमध्ये लोकांना कचरा दिसतो, त्याच नाल्यांमध्ये काही लोकांना सोनंही दिसू लागतं.
गाळ चिवडण्यासाठी येतात
या नाल्यातून सोनं काढण्यासाठी केवळ स्थानिक लोकच येत नाहीत. तर देशातील इतर राज्यातूनही लोक येतात. खासकरून राजस्थान आणि मध्यप्रदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर येतात. आरातील या बाजारांमदील नाल्यातील गाळ आणि कचरा एकत्र करतात. त्यातून सोनं मिळवण्याचा प्रयत्न करतात. चाळणीत हा कचरा टाकून त्यातील गाळ बाजूला केला जातो. आणि सोनं शोधलं जातं. पारंपारिक पद्धतीने हा गाळ चिवडला जातो. त्यातून सोनं काढून ते पारंपारिक पद्धतीने धुतलं जातं. यासाठी खूप चिकाटी आणि मेहनतीची गरज असते. अनेक तास माथापच्ची केल्यानंतर कधी कधी काहीच हाती लागत नाही. तर कधी कधी गाळातून थोडसं सोनं हाती लागतं. म्हणजे सोनं शोधण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. पण सोनं मिळेलच याची काही गॅरंटी नसते. किती प्रमाणात सोनं मिळेल हे सुद्धा सांगता येत नाही.
झाडू आणि धूळही प्यारी
केवळ कचऱ्यावरच लोकांची नजर राहत नाही. तर दुकानातून निघालेली धूळ आणि झाडूवरही नजर असते. कारण धुळीत सोनं असतंच असतं. तसेच झाडूलाही सोन्याचे कण लागलेले असतात. त्यामुळे लोक हा झाडू आणि धूळ मिळण्याची तास न् तास वाट पाहतात. घर आणि दुकानाच्या साफसफाईतून निघालेल्या कचऱ्याची बोली लावली जाते. लोक पैसे देऊन कचरा खरेदी करतात. इतकी या कचऱ्याला मागणी असते. घरातही दागिने बनवण्याचे काम सुरू असतं. त्यामुळे घराची सफाई करताना सोन्याचे कण मिळण्याची शक्यता असते.
