
माणसाचे प्रेम हे त्याच्या दिसण्यावरुन किंवा रंगरुपावरुन ठरत नाही. ते एकमेकांशी जोडलेल्या भावना, जीवापाड एकमेकांना जपणे, एकमेकांचा चुका पोटात घालून एकत्र असण्याला प्रेम म्हटले जाते. प्रेमात कधीही रंगभेद येत नाही. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील जोडप्याला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. पण, नवरदेवाने मात्र, सगळ्यांची बोलती बंद केली आहे.
प्रेमाला रंग नसतो, रूप नसतो… फक्त प्रेम असतं!
सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे जोडपं मध्ये प्रदेशमधील आहे. जवळपास 11 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे जोडपं आहे ऋषभ राजपूत आणि शोनाली चौकसे. तब्बल 11 वर्षांच्या साथीनंतर दोघांनी लग्न केलं. लग्नाचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले आणि ट्रोलर्सनी लगेच हल्ला चढवला. का तर नवरी अतिशय सुंदर आणि गोरी आहे. तर नवरा मुलगा हा रंगाने काळा आहे. एका यूजरने कमेंट करत, “अरे, ही इतकी गोरी, याने काय जादू केली असेल?” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, “पैसे असतील किंवा सरकारी नोकरी असावी, म्हणून लग्न केलं असेल” असे म्हटले आहे. काहींनी तर थेट ऋषभची रंगावरुन मजा घेतली आहे.
पण ऋषभने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष
ऋषभने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. “तुम्हाला निराश करायला आवडेल, पण मी सरकारी नोकरी करत नाही. मी आमच्या फॅमिली बिझनेसमध्ये काम करतो. आज माझी कमाई चांगली आहे, पण जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा तिने माझ्यावर प्रेम केलं. कॉलेजच्या दिवसापासून ती माझ्यासोबत आहे. चांगल्या-वाईट प्रत्येक क्षणात. म्हणून लोक काय म्हणतात याचा मला कणभरही फरक पडत नाही” असे तो म्हणाला.
पुढे तो म्हणाला, “मी जन्मापासून रंगभेदाला तोंड देत आलोय. माझा रंग सावळा आहे हे मला माहीत आहे. पण एकच सांगतो, माझ्या कुटुंबाबद्दल चुकीचं बोलू नका. तुमच्या नजरेत मी फक्त एक साधासुधा सावळा माणूस असू शकतो, पण माझ्या बायकोच्या नजरेत मी जगातील सर्वोत्तम नवरा बनण्याचा प्रयत्न करतो… आणि तेच मला महत्त्वाचं आहे. 2014 मध्ये मी पहिल्यांदा हा क्षण ‘मॅनिफेस्ट’ केला होता. हा 30 सेकंदांचा व्हिडीओ माझ्या 11 वर्षांच्या भावनांचा साठा आहे. मी घाबरलो नव्हतो, फक्त त्या सगळ्या भावना एकदम बाहेर येत होत्या.”