Doomsday Fish : देशावर मोठे संकट कोसळणार? तामिळनाडूत आढळला प्रलयाचे संकेत देणारा तो मासा, आता काय होणार?
Oarfish Spotted Tamilnadu : तामिळनाडूच्या समुद्रकिनार्यावर मोठ्या संकटाची चाहुल देणारी ओअरफिश सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा मासा जपानमध्ये त्सुनामी पूर्वी दिसला होता. तेव्हाच जगाला नैसर्गिक संकटाचा अंदाज आला होता.

खोल समुद्रात संचार करणारी ओअरफिश अथवा डूम्स डे फिश समुद्रकिनाऱ्यावर दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही फिश न्यूझीलंडनंतर तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळल्याने जगावर मोठी नैसर्गिक आपत्ती येणार असल्याचे हे संकेत असल्याचे मानले जाते. न्यूझीलंड, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर हा मासा वारंवार दिसत असल्याने वैज्ञानिकच नाही तर सर्वसामान्यांना पण कापरे भरले आहे. जपानमध्ये त्सुनामी येण्यापूर्वी हा मासा अनेकदा दिसला होता. तेव्हाच जपानला धोक्याची सूचना मिळाली होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठा फटका या देशाला सहन करावा लागला होता. सध्या जपानची बाबा वेंगा असलेल्या भविष्यवेत्तीने जपानमध्ये महाप्रलय येणार असल्याचे भाकीत केले आहे. जुलै महिना हा पूर्वेतील देशांसाठी घातक असल्याचा तिचा दावा आहे. त्यात हा मासा वारंवार दिसत असल्याने खळबळ उडाली आहे.
लोककथा काय सांगतात?
अनेक देशांच्या लोककथा आणि तिथल्या जुन्या धार्मिक ग्रंथात ओअरफिशला नैसर्गिक आपत्तीचा संकेत देणारा मासा म्हणून ओळखल्या जाते. हा मासा अपशकुनी मानल्या जातो. यामुळे मोठे नैसर्गिक संकट कोसळणार असल्याचे संकेत मिळतात. जपान, कोरिया, इंडोनेशिया-बालीमधील अनेक लोककथा या माशामुळे कोणती संकटं येतात. तो दिसल्यास काय होते याची वर्णनं असलेल्या कथा आहेत.
न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियात ओअरफिशचे दर्शन
सर्वात पहिल्यांदा यावर्षी जून 2025 मध्ये न्यूझीलंडच्या डुनेडिन आणि क्राइस्टचर्च जवळ ओअरफिशचे दर्शन झाले. जी ओअरफिश मिळाली तिचे डोके गायब होते. न्यूझीलंड हा भूकंप प्रवण देश असल्याने या भागात हा मासा दिसणे वैज्ञानिकांना हैराण करणारे आहे. तर स्थानिक लोक हे मोठ्या संकटाचे संकेत असल्याचे मानत आहेत. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या तस्मानिया या समुद्र किनारपट्टीवर हा मासा आढळला. सिबिल रॉबर्टसन या महिलेने लागलीच त्याचे फोटो काढले. हा मासा परत खोल पाण्यात गेला. तिने हे फोटो समाज माध्यमांवर शेअर करताच स्थानिकांनी ही संकटाची चाहुल असल्याच्या कमेंट केल्या.
तामिळनाडूमध्ये 30 फूट लांब डूम्स डे फिश
तर आता भारताच्या किनारपट्टीवर हा रहस्यमयी मासा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच तामिळनाडूच्या मच्छिमारांच्या जाळ्यात 30 फूट लांबीची ओअरफिश अडकली. हा मासा समुद्रात 200 ते 1000 मीटर खोलीवर आढळतो. तो आता पृष्टभागावर आढळत असल्याने चिंता वाढली आहे. अद्याप यामागील वैज्ञानिक कारण पुढे आलेले नाही.