
येणारा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असेल असं वाटतं. कारण तंत्रज्ञान झपाट्यानं पुढे जातंय आणि जगात ते आपलं वेगळं आणि मजबूत स्थान निर्माण करतंय. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आता लवकरच आणखी एक इतिहास रचला जाणारे. माहितेय हा इतिहास कोणता? जगातील पहिला रोबोट वकील! होय. जगातील पहिला रोबोट वकील पूर्णपणे तयार झालाय आणि कोर्टात हजर राहून हा रोबोट न्यायाधीशांसमोर लोकांची बाजू मांडणारे.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एक ‘रोबोट वकील’ फेब्रुवारी महिन्यात आपला पहिला खटला लढणार आहे. कोर्टात युक्तिवाद करणारा हा ‘जगातील पहिला रोबोट वकील’ असेल.
रिपोर्टनुसार, पहिला रोबोट वकील कोर्टात एका व्यक्तीचा बचाव करेल. हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणार आहे. हा रोबोट वकील रिअल टाइममध्ये न्यायालयीन युक्तिवाद ऐकेल आणि प्रतिवादीला सल्ला सुद्धा देईल.
रिपोर्टनुसार, हा रोबोट काही वर्षांपूर्वी डू नॉट पे नावाच्या स्टार्टअपने तयार केला होता. जोशुआ ब्राउनर यांच्या मालकीचा हा रोबोट वकील आहे. पूर्वी हा रोबो ग्राहकांना केवळ विलंब शुल्क (लेट फी) आणि दंड (फाईन) याबाबत सांगायचा. पण आता हा रोबोत खटले लढणार आहे. हा जगातील पहिला रोबोट वकील असल्याचा कंपनीचा दावा आहे.
डू नॉट पे चे सीईओ जोशुआ ब्राउनर म्हणाले की, एआयला सत्यावर टिकून राहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या तरी हा रोबोट आपली बाजू कशी मांडणार आणि पुढे परवानगी दिली तर आणखी कसा बोलणार, काय करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रायव्हसीच्या कारणामुळे याबाबत फारशी माहिती देण्यात आलेली नाही.
न्यायाधीश रोबोटच्या प्रोजेक्ट ट्रायलला जगात आधीच सुरुवात झाली आहे. युरोपच्या अँटोनियाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारे रोबो-जज तयार केले असून, तिथे या रोबोने न्यायाधीश म्हणून काम करण्यास सुरुवात केलीये. चीनमध्येही अशाच प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. भारतातही या दिशेने काही पावले उचलली गेली आहेत.