वर ओशो, बाजूला नग्न मूर्ती! कामसूत्र फेस्टिव्हलच्या पोस्टरने खळबळ, का होतेय तुफान चर्चा?

गोव्यात ख्रिसमसच्या काळात ‘टेल्स ऑफ कामसूत्र फेस्टिव्हल’ आयोजित करण्याच्या घोषणेमुळे प्रचंड वादंग निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण पांडे आणि स्थानिक संघटनांनी याला तीव्र विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की हा कार्यक्रम थेट सेक्स टुरिझमला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. पण टेल्ह ऑफ कामसूत्र फेस्टिव्हल नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

वर ओशो, बाजूला नग्न मूर्ती! कामसूत्र फेस्टिव्हलच्या पोस्टरने खळबळ, का होतेय तुफान चर्चा?
सांकेतिक फोटो
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 23, 2025 | 7:29 PM

सध्या सोशल मीडियावर एक फेस्टिव्हलचं पोस्टर व्हायरल होत आहे. हे फेस्टिव्हल 25 ते 28 डिसेंबर रोजी गोव्यात आयोजित करण्याच आले होते. तसेच या फेस्टिव्हलचे नाव  ‘टेल्स ऑफ कामसूत्र फेस्टिव्हल’ असे आहे. रजनीश फाउंडेशनच्या नावाने तो प्रमोट केला जात होता आणि मुख्य संचालक म्हणून ओशो लुधियाना मेडिटेशन सोसायटीशी संबंधित स्वामी ध्यान सुमित यांचं नाव होतं. कार्यक्रमात कामसूत्राशी निगडित कथा, ध्यान सत्र आणि वेलनेस अ‍ॅक्टिव्हिटी एकत्र सादर करण्याचा दावा केला जात होता. पण ख्रिसमसच्या पवित्र सणाशी त्याला जोडणं आणि नावामुळे अनेक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. अनेकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली.

नेमकी भानगड काय?

हा सगळा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा गोव्यातील एनजीओ ‘एआरझेड’ (Anyay Rahit Zindagi) चे संस्थापक व संचालक अरुण पांडे यांनी सोशल मीडियावर टेल्स ऑफ कामसूत्र फेस्टिव्हलचे पोस्टर शेअर करत विरोध केला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे. पांडे यांनी लिहिलं की, ख्रिसमस आणि कामसूत्र यांना एकत्र जोडून गोव्याला ‘सेक्स डेस्टिनेशन’ म्हणून प्रचारित केलं जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आणि राग येण्यासारखं आहे. त्यांनी गोवा क्राइम ब्रँचकडे याबाबत लेखी तक्रारही केली.

पोलिसांनी घेतली अॅक्शन

गोवा पोलिसांनी ही तक्रार अत्यंत गांभीर्याने घेतली. पोलिसांनी X (ट्विटर) वर पोस्ट टाकून सांगितलं की त्यांनी या जाहिरातीची दखल घेतली आहे आणि आयोजकांना कार्यक्रम तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सोशल मीडियावरून सगळी प्रचाराची पोस्टर्स आणि जाहिराती काढून टाकण्यास सांगितलं आहे.

व्हायरल झालेलं पोस्टर होतं तरी काय?

जाहिरातीच्या पोस्टरमध्ये कार्यक्रमाचं नेमकं ठिकाण लिहिलेलं नव्हतं, पण “भगवान श्री रजनीश फाउंडेशन” च्या बॅनरखाली तो प्रमोट केला जात होता. स्वामी ध्यान सुमित हे ओशो लुधियाना मेडिटेशन सोसायटीशी संबंधित असल्याचं सांगितलं गेलं. सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा हाच होता की ‘कामसूत्र’ आणि ‘ख्रिसमस सेलिब्रेशन’ यांना एकत्र जोडून प्रचार केला जात होता, ज्याला धार्मिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या भडकाऊ मानलं गेलं. शेवटी कायदेशीर दबावामुळे गोवा पोलिसांनी हा कार्यक्रम पूर्णपणे बॅन करून टाकला.