9 ते 5 ऑफिस, दर तासाला खायचा डब्बा; तरुणाचा व्हिडीओ पाहून डोकं चक्रावेल! नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
ऑफिसमध्ये कामाच्या व्यापात अनेकांना जेवणासाठीही वेळ मिळत नाही. मात्र, एका तरुणाचं रुटीन याच्या अगदी उलट आहे. हा तरुण 9 ते 5 या ऑफिस टाईम मध्ये जवळपास दर तासाला काही ना काही खातो.

रोजची 9 ते 5 ऑफिसची ड्युटी म्हटलं की कामाचा व्याप, ठरलेला लंच ब्रेक आणि पुन्हा कामाला सुरुवात, असं चित्र डोळ्यांसमोर येतं. पण कल्पना करा, एखादा कर्मचारी 8 ते 9 तासांच्या शिफ्टमध्ये दर तासाला काही ना काही खात असेल, तेही अगदी पराठे, मॅकरोनीपासून फळं आणि समोशांपर्यंत! तर मग साहजिकच प्रश्न पडतो, एवढं खाण्यासाठी वेळ मिळतो तरी कसा आणि काम कधी करतो? सध्या अशाच एका तरुणाच्या हटके ऑफिस फूड रुटीनची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, त्याच्या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.
नीरज भाटिया असं या तरुणाचं नाव आहे. तो इन्स्टाग्रामवर आपल्या रोजच्या खाण्यापिण्याशी संबंधित व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचे १४ हजार फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या एका व्हिडीओला २० मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. त्याच्या या भन्नाट फूड रुटीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
टिफिनचे अनेक डबे अन् खाण्याचं वेळापत्रक
व्हिडीओच्या सुरुवातीला नीरज टिफिनचा थर घेऊन दिसतो. त्यासोबत फळं आणि काकडीही आहे. त्यानंतर सुरू होतं त्याचं खाण्याचं वेळापत्रक. नीरजच्या या फूड रुटीनमध्ये सकाळी ९ वाजता पनीर पराठ्याने सुरुवात होते. त्यानंतर सकाळी १० वाजता मॅकरोनी, तर ११ वाजता काळे चणे खाताना दिसतो. दुपारी १२ वाजता फळं खातो. दुपारी १.३० वाजता जेवणात तो भात, डाळ आणि सलाड खाताना दिसतो. तर दुपारी २.३० वाजता पाणीपुरी आणि ३.३० वाजता ग्रीन टी आणि संध्याकाळी ४.३० वाजता समोसे खाताना दिसतो.
पहा व्हिडीओ-
नेटकऱ्यांना पडला एकच प्रश्न!
नीरजचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. इतक्या कमी अंतराने वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी वेळ कसा मिळतो, दिवसभर इतकं खाल्ल्यानंतर काम कधी करतो, असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. काही जणांनी दिवसभर डेस्कवर बसून काम करताना शारीरिक हालचालींसाठी वेळ मिळतो का, याबाबतही उत्सुकता व्यक्त केली आहे.