नाचू किर्तनाचे रंगी, किर्तनाच्या तालावर चक्क हरीण नाचले, व्हिडीओ व्हायरल

सोशल मिडीयावर हरीणाचा व्हिडीओ एका आयएफएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. त्यात 'लहान मुलांसह किर्तनाचा आनंद घेताना एक काळं हरीण दिसत आहे.

नाचू किर्तनाचे रंगी, किर्तनाच्या तालावर चक्क हरीण नाचले, व्हिडीओ व्हायरल
BLACKBUCK
Image Credit source: socialmedia
| Updated on: May 27, 2023 | 1:10 PM

मुंबई : आपल्या संतांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असा मंत्र दिला आहे. सर्व पृथ्वीवासी, मग ते मनुष्य असो वा प्राणी किंवा वनस्पती, सर्व एकाच परिवाराचे सदस्य आहेत अशी शिकवण आपल्या संतांनी दिली आहे. सर्व पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र एकच आहेत. त्यांचे कुटुंब एकच आहे हा नारा एका हरीणाने खरा करून दाखविला आहे. आपल्या संतांनी किर्तनातून समाज प्रबोधनाची वाट धरली आहे. असाच एका किर्तनाच्या तालात नाचणाऱ्या हरीणाचा ( काळवीट ) व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

किर्तनाने आपली पावले थीरकतातच पण या सुष्टीतील चराचरावर देखील किर्तनाचा परीणाम होतो याचा दाखला देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका खेड्यातील हा व्हिडीओ आहे. यात गावातील मंदिरातील मुले आणि मुली जय जय पांडुरंग हरी, रामकृष्ण हरीच्या तालावर ताल वाजवत पांडुरंग भक्ती लीन झालेली दिसत आहेत. त्यात एक हरीणही त्यांच्या तालावर थुई थुई नाचताना आणि आनंदाने हरखून उड्या मारताना दिसत आहे. एरव्ही हरीणासारखा लाजाळू प्राणी माणसाच्या सावलीलाही उभा रहात नाही. परंतू या हरीणाला मुलांच्या तालावर नाचताना पाहुन आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ महाराष्ट्रातील एका गावातील दिसत आहे. मात्र नेमक्या कोणत्या गावातील हा व्हिडीओ आहे याचा उल्लेख या पोस्टवर केलेला नाही. या अधिकाऱ्याने त्यास व्हॉट्सअप फॉरवर्ड म्हटले आहे. या 27 सेंकदाच्या व्हिडीओत आपण पाहू शकता की दोन वयस्कासोबत लहान मुलांचा समुह किर्तन म्हणताना दिसत आहेत. पांडुरंग हरीचा घोष करताना मुले जरी उड्या मारत आहेत. त्याच तालावर हरीणही मस्तपैकी उड्या मारत नाचत आहे.

हा पाहा व्हिडीओ…

 

या व्हिडीओला आयएफएस अधिकारी सुशांत नंदा (IFS Susanta Nanda) यांनी ट्वीटरवर शेअर केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की भारतात काळ्या हरणाला उगाच कृष्णसार, कृष्ण जिन्का, आणि कृष्णमृग म्हणत नाहीत. हिंदू पौराणिक कथात काळं हरीण भगवान कृष्णाचा रथ खेचते..त्यामुळे ते रामकृष्ण हरीच्या तालात नाचत असावे असे म्हटले आह.. त्यामुळे हे हरीण मनापासून किर्तनाचा आनंद घेत असावे असे त्यांनी म्हटले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ८४ हजार वेळा पाहीलं गेले आहे. तीन हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाईक्स केले आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रीया लिहील्या आहेत. काहीनी हे पाळीव हरीण असणार असे लिहीले आहे. तर अनेकांनी त्याचा कृष्णभक्त म्हणून उल्लेख केला आहे.