
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहन चालवणाऱ्यांसाठी एअर कंडिशनिंग (AC) ही एक अत्यावश्यक सुविधा बनली आहे. मात्र, अनेकजण वाहन चालवताना नव्हे तर ते पार्क केलेल्या अवस्थेतही एसी सुरू ठेवतात. विशेषतः जेव्हा गाडी उन्हात उभी असते, तेव्हा आतमध्ये शिरेल तितकी गरमी असते, म्हणून थोडा वेळ थांबण्याच्या उद्देशाने एसी चालू ठेवण्याची सवय बऱ्याच लोकांमध्ये आहे. पण प्रश्न असा आहे की गाडी उभी असताना AC सुरू ठेवणं योग्य का?
वाहन जर पार्क केलेलं असेल आणि इंजिन बंद असेल, तरी त्यावर एसी सुरू ठेवणं सुरक्षित मानलं जात नाही. यामागील कारण म्हणजे काही वेळानंतर ही सवय तुमच्या गाडीच्या बॅटरीवर, इंजिनवर, इंधनावर आणि तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते. आधुनिक गाड्यांमध्ये थोडा वेळ अशा स्थितीत AC सुरू ठेवणं शक्य असतं, पण तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळासाठी हे टाळणंच अधिक चांगलं.
गाडी जर बंद जागेत उभी असेल जसे की, गॅरेज किंवा पार्किंग लॉट आणि जर AC सुरू ठेवले गेले तर कार्बन मोनोऑक्साईडसारखी विषारी वायू आत तयार होऊ शकते. ही गंधहीन वायू असते, जी श्वासाद्वारे शरीरात जाऊन विषारी परिणाम घडवू शकते. विशेषतः गाडीचे एग्झॉस्ट जर चुकीच्या दिशेने वळवले गेले असेल, तर हा धोका अधिक वाढतो.
गाडीचा AC सिस्टीम ही संपूर्णपणे बॅटरीवर अवलंबून असते. जेव्हा इंजिन बंद असतं आणि AC सुरू असतो, तेव्हा बॅटरीवर मोठा भार येतो. त्यामुळे काही वेळातच बॅटरी ड्रेन होण्याची शक्यता असते आणि तुम्ही अचानक गाडी सुरू करू शकणार नाही. यामुळे तुमचं काम खोळंबू शकतं किंवा तुम्हाला रस्त्यावर अडकावं लागू शकतं.
तुम्हाला जर काही वेळ गाडीत थांबावं लागत असेल, तर किमान एक खिडकी उघडी ठेवणं गरजेचं आहे. गाडी गरम झालेली असेल, तर त्यात बेंझीनसारखा हानिकारक वायू तयार होतो, जो बंद गाडीत साचतो. त्यामुळे खिडक्या उघडल्यास वायुवीजन होऊन त्याचा प्रभाव कमी होतो. शक्य असल्यास छायेत गाडी लावा आणि शक्यतो एसीवर अवलंबून राहण्यापेक्षा नैसर्गिक थंडावा वापरण्याचा प्रयत्न करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)