
सुप्रीम कोर्टाने सोमवारी (26 मे 2025) घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या एका जोडप्याला असा सल्ला दिला आहे, जो प्रत्येकाच्या मनाला भिडेल. कोर्टाने या जोडप्याला सांगितले की, त्यांनी कोर्टरूमच्या बाहेर शांत वातावरणात त्यांच्यातील मतभेदांवर चर्चा करावी आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. तसेच, त्यांनी एकत्र डिनरला जावे. कारण त्यांच्या मतभेदांचा परिणाम त्यांच्या तीन वर्षांच्या मुलावरही होईल.
हा खटला न्यायाधिश बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आला होता. एका फॅशन उद्योजक असलेल्या पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला परदेश दौऱ्यावर घेऊन जाण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांचा घटस्फोटाचा खटला आधीपासूनच सुरू आहे आणि मुलाच्या ताब्याबाबतही दोघे कायदेशीर लढाई लढत आहेत. कोर्टाने चिंता व्यक्त केली की, या जोडप्यामधील वादाचा परिणाम त्यांच्या मुलावर होईल, जो त्याच्या भवितव्यासाठी योग्य नाही. कोर्टाने जोडप्याला याकडे लक्ष देण्यास सांगितले, कारण हे मुलाच्या भविष्यासाठी चांगले नाही.
वाचा: ज्योती मल्होत्रानंतर CRPF जवानाचा खरा चेहरा समोर, थेट पाकिस्तानला पाठवले भारताचे…
खंडपीठाने जोडप्याला सांगितले, “तुम्हाला तीन वर्षांचे मूल आहे. दोघांमधील अहंकाराचा प्रश्न काय आहे? आमची कँटीन यासाठी फारशी चांगली नसेल, पण आम्ही तुम्हाला दुसरे ड्रॉइंग रूम उपलब्ध करून देऊ. आज रात्री डिनरला भेटा. एका कॉफीवर खूप काही चर्चा होऊ शकते.”
कोर्टाने या जोडप्याला सांगितले की, त्यांनी भूतकाळातील कटुता गिळून टाकावी आणि भविष्याचा विचार करावा. सुप्रीम कोर्टाने सकारात्मक परिणामाची अपेक्षा व्यक्त करत खटल्याची सुनावणी मंगळवारपर्यंत पुढे ढकलली. खंडपीठाने म्हटले, “आम्ही दोन्ही पक्षांना एकमेकांशी बोलण्याचे आणि उद्या कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत…”
कोर्टाने या जोडप्याला आरामदायी वातावरण देण्याच्या प्रयत्नात, कोर्टाच्या कँटीनच्या जेवणाच्या गुणवत्तेवर हलक्या-फुलक्या शैलीत भाष्य करत सांगितले की, कोर्टाची कँटीन यासाठी योग्य ठरणार नाही, त्यामुळे त्यांनी जोडप्यासाठी दुसऱ्या ड्रॉइंग रूमची व्यवस्था करण्याचा पर्याय दिला. कोर्टाने यावर जोर दिला की, त्यांना त्यांच्या मतभेदांवर चर्चा करण्याची खूप गरज आहे, जेणेकरून त्याचे निराकरण होऊ शकेल. त्यांनी पुन्हा सांगितले की, जोडप्याने आज रात्री डिनरला जावे. कोर्टाने जोडप्याला हे समजावून सांगितले की, छोट्या-छोट्या प्रयत्नांमुळे खूप सकारात्मक परिणाम मिळू शकतात, जसे की फक्त एका कॉफीवर जाऊनही बरीच चर्चा होऊ शकते.