UPSC Aspirant Viral Video: हजारो पेनांचा ढीग… UPSC पास होण्यासाठी तरुणाची जिद्द; VIDEO पाहून शॉक व्हाल!
सोशल मीडियावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संघर्ष दाखवणारे, प्रेरणा देणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

UPSC Aspirant Anand Mohan Viral Video: युपीएससी सारखी अवघड परीक्षा देणं म्हणजे फक्त हुशार असून चालत नाही. त्यासाठी लागते संघर्ष करण्याची तयारी, सातत्य अन् रात्रंदिवस अभ्यास. त्यामुळे अशा अवघड स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण- तरुणी आपल्याला जराही वेळ न घालवता रात्रंदिवस अभ्यास करताना दिसतात. सोशल मीडियावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संघर्ष दाखवणारे, प्रेरणा देणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
युपीएससी पास होण्याची जिद्द, समोर पेनांचा ढीग!
युपीएससी करणारे तरुण- तरुणी दिवसरात्र अभ्यास करणे, नोट्स काढणे आणि वारंवार सराव परीक्षा देण्यात व्यस्त असतात. त्यांच्या या संघर्षाच्या काळातील सोबती म्हणजे पेन अन् वही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, UPSC इच्छुक उमेदवार आपल्या तयारीदरम्यान किती पेन वापरतो? UPSCची तयारी करणाऱ्या आनंद मोहनने या प्रश्नाचे एक रंजक उत्तर दिले आहे.
त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या अभ्यासाच्या खोलीत दिसत आहे. पुस्तके आणि इतर अभ्यासाच्या साहित्यासोबतच, त्याने वापरलेल्या पेनांचा एक ढिगही दाखवला. व्हिडिओमध्ये, आनंद स्पष्ट करतो की त्याने पेन मोजले नाहीत, परंतु बॉक्समधील संख्या सुमारे 500 आहे. असे दुप्पट पेन मी वापरले असल्याचेही तो स्पष्टपणे सांगतो. म्हणजेच त्याने युपीएससीच्या तयारीदरम्यान जवळपास हजार पेन वापरले आहेत.
View this post on Instagram
आनंदने सांगितला यशाचा मंत्र, नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
आनंद व्हिडिओमध्ये काही मनोरंजक गोष्टीही सांगतो. तो म्हणतो की, 50 पानांचा एक पूर्ण पेपर लिहिण्यासाठी सुमारे दीड पेन लागतो. त्याने आतापर्यंत वापरलेल्या पेनच्या संख्येनुसार, त्याने अंदाजे 800 ते 900 पूर्ण पेपर्स लिहिले असतील. यावेळी तो एक महत्त्वाचा मुद्दाही मांडतो. त्याने सांगितले की, ज्या उमेदवारांनी त्याच्यासोबत यूपीएससी परीक्षा दिली, त्यांनी खूप मेहनत घेतली असेल.
काहींनी कदाचित जास्त मेहनत घेतली असेल, पण कोणीही कमी मेहनत घेतली असे त्याला वाटत नाही. दरम्यान, त्याच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले आहे तसेच तो नक्की यशस्वी होईल अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.
