
पाणीपुरी… सर्वांचाच आवडता प्रकार, ती खाण्यासाठी अनेकजण लांबपर्यंत आवडत्या पाणीपुरीवाल्याकडे जायला प्रवास करतात. पण याच पाणीपुरीवरून राडा झाला तर ? वाचून हैराण झालात ना, पण हा पुढला किस्सा वाचून तर तुम्ही डोक्यालाच हात लावाल. पाणीपुरीवरून रस्त्यात राड झाल्याची एक घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातमधील वडोदरा येथे ही विचित्र घटना घडली, ज्यामुळे पोलिस आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांमध्ये तासन्तास गोंधळ उडाला. एका महिलेने सूरसागर तलावाजवळ रस्त्यावर चक्क आंदोलन केले. तेही पाणीपुरीसाठी..
पाणीपुरीच्या एका स्टॉलवर तिला दोन पाणीपुरी कमी दिल्याने ती महिला नाराज झाली होती. त्याचा निषेधनोंदवत ती चक्क रस्त्यावर बसली आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूकच ठप्प झाली. 20 रुपयांना सहा ऐवजी तिला फक्त चार पाणीपुरी देण्यात आल्या,त्यामुळे ती नाराज झाली. तिने पाणीपुरी विक्रेत्याला उरलेल्या दोन पुऱ्या देण्यास सांगितले. पण तिची मागणी काही पूर्ण झाली नाही, ते पाहून ती एवढी नाराज झाली की ती महिला एखाद्या लहान मुलासारखी रस्त्यावर फतकल मारू बसली आणि रडू लागली. तिच्या या निषेधामुळे लोकं तर पाहू लागलेच पण काही वेळातच रस्त्यावर वाहनांची लांब रांग लागली आणि संपूर्ण रस्ता अडवला गेला.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. रडत रडत तिने पोलिसांना सगळं सांगितलं आणि म्हणाली, “हा पाणीपुरी विक्रेता सर्वांना सहा पुऱ्या देतो, पण त्याने मला दोन कमी दिल्या आहेत. एकतर मला आणखी दोन पुऱ्या द्या नाहीतर त्याचे दुकान येथून काढून टाका.” असा हट्टच तिने धरला.
A woman went to have panipuri but was served 4 instead of 6 for ₹20.
She objected, sat down on the road in protest, and even broke into tears.
The twist? Kudos to Vadodara Police for stepping in and resolving this pani-filled crisis swiftly!pic.twitter.com/37DYZAOMkd
— Kumar Manish (@kumarmanish9) September 19, 2025
पाणीपुरीच्या दोन पुऱ्यांवरून सुरू असलेलं हे नाटक तासन्तास चालले. अखेर, खूप प्रयत्नांनंतर, पोलिसांनी महिलेला तेथून निघून जाण्यास भाग पाडले, त्यानंतरच वाहतूक कोंडी दूर झाली. या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे आणि या अनोख्या निषेधावर लोकांना आपले हसू आवरत नाहीये.
काय म्हणाली महिला ?
“तो मला दरवेळी कमी पुऱ्या देतो. तो नेहमीच दादागिरी करतो. खरंतर तो 20 रुपयांना 6 पुऱ्या देतो, पण मला मात्र तो दरवेळी कमी पुऱ्या देतो. तो नेहमी माझ्याशी भांडत असतो. त्याची गाडी आता बंदच केली पाहिजे. मला त्याची गाडी इथे नकोच…” असं म्हणत त्या महिलेने तिचा हेका कायम ठेवलाय. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून लोकांनाही त्यावर मजेशील कमेंट्स दिल्या आहेत.