
अटल पेन्शन योजना अल्पवाधीत लोकप्रिय ठरली. या लोकप्रिय निवृत्ती योजनेत आता बदल झाले आहेत. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) बदलाचे आदेश दिले. त्यानुसार अटल पेन्शन योजनेसाठी (APY) या 1 ऑक्टोबर 2025 रोजीपासून नवीन नोंदणी अर्ज(Form) लागू करण्यात आला आहे. जुन्या फॉर्मआधारे यापुढे योजनेत पात्र व्यक्तीला सहभागी करुन घेण्यात येणार नाही. केंद्रीय रेकॉर्डकीपिंग एजन्सी (CRA) प्रोटीन (Protean) आता जुने अर्ज स्वीकारणार नाही. डेटा अचुकता सुधारण्यासाठी आणि कार्यप्रणालीत सूसुत्रता आणण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे.
APY च्या नवीन अर्जात काय बदल
या अर्जात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. FATCA/CRS याची माहिती द्यावी लागेल. त्यामुळे या योजनेत एखादा परदेशी नागरीक घुसखोरी करणार नाही. भारतीय नागरिकांना एपीआयचा फायदा घेता येईल. आंतरराष्ट्रीय कर अनुपालन मानकांशी ही प्रक्रिया जुळवण्यात आली आहे. टपाल खात्याने सर्व पोस्ट ऑफिसला APY च्या नवीन अर्जाद्वारेच नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 26 सप्टेंबर 2025 रोजी याविषयीचे निर्देश देण्यात आले आहे. PFRDA च्या नवीन धोरणानुसार, APY फॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे. आता अद्ययावत APY सबस्क्राईबर रजिस्ट्रेशन फॉर्म भरूनच नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शुल्कात काय झाला बदल?
नवीन अर्जासह पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने 1 ऑक्टोबरपासून एक अपडेट फी स्ट्रक्चर सादर केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना PRAN घेण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक PRAN किटसाठी 18 रुपये तर कार्डसाठी 40 रुपये द्यावे लागतील. 100 रुपये वार्षिक देखभाल शुल्क भरावे लागेल. APY आणि NPS-Lite खाते उघडणे आणि देखभाल खर्चासाठी 15 रुपये शुल्क आकारण्यात येईल. तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 2 लाखांच्या शिल्लक रक्कमेवर 100 रुपये तर 50 लाखांपेक्षा अधिक रक्कमेवर 500 रुपयांचे वार्षिक देखभाल शुल्क मोजावे लागेल. तर सर्व व्यवहारावरील शुल्क माफ असेल.
अटल पेन्शन योजना कुणासाठी फायदेशीर?
अटल पेन्शन योजना (APY), भारतीय नागरिकांसाठी, असंघटित क्षेत्रातील कामगार, कष्टकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना आहे. या योजनेतंर्गत 60 व्या वर्षी लाभार्थ्यांना 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये वा 5000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्याची हमी मिळते.
कुठे उघडाल खाते
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना केंद्र सरकारने यापूर्वी सुरू केली होती, मात्र त्यानंतर तिची लोकप्रियता वाढली आणि सरकारने 18 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंतच्या सर्व लोकांसाठी ही योजना खुली केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून खाते उघडू शकता.
करदात्याला नाही संधी
नियमांनुसार, कोणताही नागरिक जो प्राप्तिकर कायद्यांतर्गत कर भरतो, अशा करदात्याला अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. एपीवाय(APY)साठी अर्ज करणारी व्यक्ती आयकराच्या कक्षेत आल्यास, त्याचा अर्ज आणि खाते ताबडतोब बंद करण्यात येईल, असे या नियमात स्पष्ट करण्यात आले. या निर्णयाची राजपत्र अधिसूचना 10 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, 1 ऑक्टोबर 2022 रोजी अथवा त्यानंतरच्या करदात्यांना या योजनेचा लाभ होत नाही.