Loan EMI : एचडीएफसीनंतर ICICI बँकेचे कर्ज महाग, 0.15 टक्के वाढ; EMI वाढणार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Aug 01, 2022 | 7:16 PM

आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार एक ऑगस्टपासून नव्या सुधारीत दरानुसार एक वर्षाच्या कालावधीसाठी एमसीएलआर 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 7.90 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Loan EMI : एचडीएफसीनंतर ICICI बँकेचे कर्ज महाग, 0.15 टक्के वाढ; EMI वाढणार
एचडीएफसीनंतर ICICI बँकेचे कर्ज महाग, 0.15 टक्के वाढ

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय (ICICI Bank)बँकेने कर्जदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून बँकेच्या कर्जावरील व्याजदरात 0.15 टक्क्यांची वाढ होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या (Reserve bank of India) संभाव्य व्याजदरातील बदलांच्या पार्श्वभूमीवर बँकेने हा सर्व कालावधीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एचडीएफसी बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. एचडीएफसीने गेल्या आठवड्यात आरपीएलआरमध्ये वाढ केली. एचडीएफसीने (HDFC Bank) 0.25 टक्क्यांची वाढ आरपीएलआरमध्ये केली होती. नवीन दरसंरचना आजपासून (एक ऑगस्ट) लागू केली जाणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार एक ऑगस्टपासून नव्या सुधारीत दरानुसार एक वर्षाच्या कालावधीसाठी एमसीएलआर 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 7.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. एक दिवसाच्या कालावधीसाठी व्याजदर 7.65 टक्के असणार आहे.

ईएमआय वाढणार, खिशाला झळ!

वाढत्या महागाईला ब्रेक लावण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक आर्थिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. आरबीरआयच्या संभाव्य तिमाही पतधोरणात रेपो दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर (Repo rate) वाढीमुळं सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी कर्ज दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जाते. एमसीएलआर (MCLR) मध्ये वाढ केल्यामुळे वैयक्तिक, व्यावसायिक, वाहन, गृह सर्वप्रकारचे कर्ज महागणार आहेत. एमसीएलआर मध्ये वाढ केल्यानंतर त्याचा थेट परिणाम ईएमआय वर होतो. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणाऱ्या व्यक्तींच्या ईएमआयमध्ये थेट वाढ होते. रेपो दरात वाढ केल्यामुळे रेपो दराशी संबंधित गृहकर्ज देखील महागणार आहे.

एमसीएलआर म्हणजे काय?

MCLR ही निधी-आधारित कर्ज दराची सीमांत किंमत (Marginal Costs of Fund-Based Lending Rate) मानली जाते. कर्ज देण्यापूर्वी बँकांद्वारे ग्राहकांकडून आकारण्यात येणारा किमान व्याजदर ठरतो. सर्व बँकांच्या कर्ज दरात सुसूत्रता असावी या हेतूने रिझर्व्ह बँकेने एमसीएलआरची निश्चिती केली आहे. आरबीआय अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या सर्व बँकांना एमसीएलआरची अंमलबजावणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

रेपो दर म्हणजे काय?

रिझर्व्ह बँकेद्वारे अखत्यारीतील बँकांना भाग भांडवलाचा पुरवठा केला जातो त्या दरास रेपो दर म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराचा परिणाम अन्य बँकांच्या दरावर थेट जाणवतो. रेपो दरात वाढ केल्यास बँकांना आपल्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या दरात वाढ करणे आवश्यक ठरते. रेपो दरात वाढ झाल्यास लेडिंग रेटमध्ये निश्चितपणे वाढ होते.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI