इंडोनेशियाकडून पाम तेलावरील निर्यातबंदी मागे; भारतात तेल स्वस्त होणार!

| Updated on: May 20, 2022 | 2:48 PM

इंडोनेशियाने पाम तेलावर घातलेली निर्यात बंदी उठवण्याचा निर्यण घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतात तेलाची आवक वाढून तेल स्वस्त होऊ शकते.

इंडोनेशियाकडून पाम तेलावरील निर्यातबंदी मागे; भारतात तेल स्वस्त होणार!
खाद्यतेल
Follow us on

महागाई (Inflation) गगनाला भिडली आहे. मात्र येणाऱ्या काळात महागाईपासून सामान्यांना थोडा दिलासा मिळू शकतो. सध्या खाद्यतेलाचे (Edible Oil) दर उच्चस्थरावर पोहोचले आहेत. परंतु आता खाद्य तेलाचे दर कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. पाम ऑईलचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवर निर्बंध घातल्याने भारतात तेलाचे दर वाढले होते. मात्र आता इंडोनेशियाने (Indonesia) निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतात तेलाची आवक वाढून दर स्वस्त होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. इंडोनेशियाकडून पाम तेलावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारपासून पुन्हा एकदा तेल निर्यातीला सुरुवात होणार आहे. इंडोनेशियाकडून भारत मोठ्याप्रमाणात पाम तेलाची आयात करतो. भारत दरवर्षी तब्बल 80 लाख टन पाम ऑईलची आयात करतो. भारतामध्ये एकूण तेल वापरापैकी 40 टक्के हिस्सा हा एकट्या पाम तेलाचा आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा इंडोनेशियाकडून तेलाची आयात सुरू झाल्यास भारतात तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

‘या’ कारणांमुळे उठवली निर्यात बंदी

याबाबत बोलताना इंडोनेशियाच्या वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित एक अधिकाऱ्याने सांगितले की, महागाईला लगाम घालण्यासाठी आम्ही तेल निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र सध्या आमच्याकडे पाम तेलाचे एवढे उत्पादन झाले आहे की, अतिरिक्त तेल साठवण्यासाठी आमच्याकडे कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही. आणखी तेलाचा साठा आम्ही साठवू शकत नसल्याने इंडोनेशियन सरकारने तेल निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 28 एप्रिल रोजी इंडोनेशियाकडून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. ती आता सोमवारपासून उठवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

युक्रेन, रशिया युद्धामुळे सूर्यफूल तेलाचा तुटवडा

भारतात तेलाचे दर वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध हे एक आहे. भारत रशिया आणि युक्रेनमधून मोठ्याप्रमाणात सूर्यफूलाच्या तेलाची आयात करतो. मात्र या दोन देशात युद्ध सुरू असल्यामुळे तिकडून होणाऱ्या तेलाची आयात ठप्प आहे. त्यामुळे देशात आधीच तेलाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यात भरीसभर म्हणजे इंडोनेशियाकडून देखील पाम तेलाची निर्यात बंद करण्यात आली होती. त्यामुळे देशात खाद्यतेलाचे दर वाढले होते. मात्र आता निर्यात पुन्हा सुरू होत असल्याने तेल स्वस्त होण्याची शक्यात आहे.