
पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शहरांमध्ये गॅस टंचाईचे चटके बसत आहेत. एलपीजी सिलिंडर वितरणासाठी चक्क पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. युद्ध सुरूच राहिल्यास गॅस सिलिंडर मिळणार नाही, या भीतीने वितरकांच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. यादरम्यान साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने आता सिलिंडर बुक केल्यानंतर पुढील रीफिलसाठी कमीत कमी 25 दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असं स्पष्ट केलं आहे. याआधी हा कालावधी 21 दिवसांचा होता. अशातच जर तुम्हाला सिलिंडर बुक करायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, ते जाणून घ्या..
आजकाल स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकाकडे व्हॉट्स ॲप आहे आणि गॅस कंपन्यांनी या प्लॅटफॉर्मद्वारेही बुकिंगचा पर्याय दिला आहे. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि त्यात तुम्ही व्हॉट्स ॲप वापरत असाल तर त्यावरून तुम्ही एलपीजी सिलिंडर बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीच्या व्हॉट्स ॲप नंबरवर एक छोटासा मेसेज पाठवावा लागेल. जो मोबाइल नंबर गॅस एजन्सीकडे नोंदणीकृत असेल त्याच नंबरवरून हा मेसेज पाठवणं गरजेचं आहे.
जर तुमच्याकडे इंटरनेट सेवा उपलब्ध नसेल किंवा तुम्ही स्मार्टफोन वापरत नसाल, तरीसुद्धा गॅस सिलिंडर बुक करणं सोपं आहे. यासाठी मिस्ड कॉलचा पर्याय उपलब्ध आहे. जे सर्वसामान्य फोन वापरतात, त्यांच्यासाठी हा सोपा पर्याय आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीच्या मोबाइल नंबरवर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल.
मिस्ड कॉल दिल्यानंतर तुमची बुकिंग सिस्टिममध्ये नोंद केली जाते आणि त्यानंतर काही वेळातच तुमच्या मोबाइलवर कन्फर्मेशनचा मेसेज मिळतो.
सध्याच्या डिजिटल युगात ॲपच्या वापराने एलपीजी सिलिंडर बुक करणं अधिक सोपं झालं आहे. अनेकजण डिजिटल पद्धतीनेच व्यवहार करतात आणि वीज बिल, मोबाइल रिचार्ज, इतर पेमेंसाठी विविध ॲप्सचा वापर करतात. अशाच ॲप्सद्वारे तुम्ही सिलिंडरसुद्धा बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला Paytm, Google Pay किंवा PhonePe यांसारख्या अॅपमध्ये Recharge & Pay Bills या सेक्शनमध्ये जावं लागेल.
या सेक्शनमध्ये तुम्हाला Book a Cylinder चा पर्याय दिसेल. त्यानंतर तुमची गॅस कंपनी निवडून तुम्हाला कंज्युमर नंबर किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर तिथे टाइप करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही गॅस सिलिंडर बुकिंग आणि त्याचं पेमेंटसुद्धा करू शकता.
गॅस कंपन्यांनी ग्राहकांना थेट फोन कॉलद्वारेही बुकिंगचीही सुविधा दिली आहे. यासाठी IVRS म्हणजेच ऑटोमेटेड कॉल सिस्टिमचा वापर केला जातो. या प्रक्रियेत तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरने तुमच्या गॅस कंपनीच्या IVRS नंबरवर कॉल करावा लागेल. कॉल कनेक्ट झाल्यानंतर समोरून एक रेकॉर्डेड आवाज तुम्हाला ऐकू येईल आणि त्यात विविध पर्याय सांगितले जातील.
उदाहरण द्यायचं झाल्यास Indane गॅस कंपनीच्या सिलिंडर बुकिंगसाठी 7718955555 या नंबरवर कॉल केलं जाऊ शकतं. त्यानंतर व्हॉइस इन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला रीफिल बुकिंगचा ऑप्शन निवडावा लागेल. हा ऑप्शन निवडताच तुमची बुकिंग पूर्ण होईल आणि त्यानंतर कन्फर्मेशनचा मेसेज येईल.
जर तुम्ही कम्प्युटर किंवा मोबाइल ब्राऊजरचा वापर करून बुकिंग करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुम्हाला गॅस सिलिंडर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. बुकिंगचा हा पर्यायसुद्धा सोपा आणि सुरक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला गॅस कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करावं लागेल. तिथे कंज्युमर नंबर किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाइप करून अकाऊंटचा एक्सेस मिळवावा लागेल. लॉगिन केल्यानंतर Book Cylinder किंवा Refill Booking असा पर्याय तुम्हाला दिसेल. त्याची निवड करून तुम्ही सिलिंडर बुक करू शकता आणि पेमेंटसुद्धा पूर्ण करू शकता. इतकंच नव्हे तर तुम्ही डिलिव्हरी स्टेटससुद्धा ट्रॅक करू शकता.