SBI Loan | स्वातंत्र्यदिनी स्टेट बँकेची महागडी भेट, तुमच्या कर्जाचा हप्ता महागला

| Updated on: Aug 15, 2022 | 2:48 PM

SBI Loan | सहा महिन्यांचा MCLR 7.45 टक्क्यांवरून 7.65 टक्के, एक वर्षाचा MCLR 7.5वरून 7.7 टक्के, दोन वर्षांचा MCLR 7.7 टक्क्यांवरून 7.9 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR 7.8 टक्क्यांवरून 8% करण्यात आला आहे.

SBI Loan | स्वातंत्र्यदिनी स्टेट बँकेची महागडी भेट, तुमच्या कर्जाचा हप्ता महागला
कर्ज महागले
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

SBI Loan | स्वातंत्र्य दिनी (Independence Day 2022 News) देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना महागडी भेट दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर एसबीआयने ही कर्जदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेचे नवे दर 15 ऑगस्टपासून (15 August) लागू झाले आहेत. कर्जाचा दर वाढल्याने आता कर्ज महाग होणार आहे आणि ग्राहकांना कर्जाचा ईएमआय (EMI) पूर्वीपेक्षा जास्त भरावा लागणार आहे. बँकेचा कर्ज दर म्हणजे MCLR मध्ये वाढ करण्यात आली आहे. MCLR हा कर्जादाराची सीमांत किंमत दर्शवितो, तो रक्कमेवर आधारीत असतो. ज्यांनी या MCLR च्या आधारे कर्ज घेतले आहे, त्यांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. त्यांना EMI ही पूर्वीपेक्षा जास्त मोजावा लागणार आहे. गृहकर्जदारांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. कारण किरकोळ कर्जामध्ये MCLR ची महत्वाची भूमिका असते.

असा वाढला दर

आता तीन महिन्यांसाठी SBI MCLR मध्ये 7.15 टक्क्यांवरून 7.35 टक्के करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, सहा महिन्यांच्या MCLR 7.45% वरून 7.65%, एक वर्षाच्या MCLR 7.5% वरून 7.7%, दोन वर्षांच्या MCLR 7.7% वरून 7.9% आणि तीन वर्षांच्या MCLR 7.8% वरून 8% करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात देखील SBI ने MCLR 10 बेसिस पॉईंटने वाढवला होता. ही वाढ विविध मुदतीच्या कर्जावर करण्यात आली आहे.

मग EMI किती वाढेल?

समजा तुम्ही 30 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांसाठी घेतले आहे. कर्जाच्या दरात वाढ झाल्यानंतर व्याजदर 7.55 टक्के असेल तर ईएमआय किती असेल ते पाहुयात. 20 वर्षांसाठी 30 लाखांच्या कर्जासाठी 24,260 रुपये EMI द्यावा लागेल. म्हणजेच, ग्राहकाला एकूण 28,22,304 रुपये व्याज भरावे लागेल. आता समजा व्याजदर 7.55 टक्क्यांवरून 8.055 टक्क्यांपर्यंत वाढला, तर EMI रुपये 25,187 होईल आणि तुम्हाला एकूण 30,44,793 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. म्हणजेच ग्राहकाला 20 वर्षांसाठी 30 लाखांच्या गृहकर्जावर ईएमआयच्या रुपात दरमहा 927 रुपये जादा मोजावे लागतील.

हे सुद्धा वाचा

MCLR का वाढला?

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने स्टेट बँकेने MCLR वाढवला आहे. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने एकरकमी 50 आधार अंकांची वाढ केली आहे. त्यामुळे अनेक बँकांनी कर्जाचे दर वाढवले ​​आहेत. कर्जावरील ईएमआय वाढला असला तरी मुदत ठेव योजना आणि बचत खात्यावरील व्याजदर ही वाढल्याने ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार आहे. गेल्या आठवड्यात एसबीआयने रिटेल मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. वेगवेगळ्या मुदतीच्या ठेवी दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. SBI सध्या 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD योजना चालवत आहे, ज्यामध्ये सर्वसामान्यांसाठी 2.90% ते 5.65% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.40% ते 6.45% व्याजदर आहेत.