
भारतीय रेल्वे ही भारताची जीवनरेखा आहे. दररोज कोट्यवधी लोक ट्रेनने प्रवास करतात. लांबचा प्रवास असो वा कमी खर्चात आरामदायी सफर, यामुळेच अनेक जण ट्रेनला पसंती देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की ट्रेन तिकिटासोबत अनेक सुविधा मोफत मिळतात? माहिती नसल्याने बरेच जण या सुविधांचा लाभ घेत नाहीत. कोणत्या सुविधा मिळतात, चला जाणून घेऊया.
1. मोफत वाय-फाय
तुम्ही रेल्वे ट्रॅकवर पोहोचलात आणि ट्रेन काही तास उशिराने आहे तर तुम्हाला रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय वापरता येतं. तुम्ही अर्धा तास मोफत इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. 10 रुपयांत 5GB किंवा 15 रुपयांत 10GB, एका दिवसाच्या वैधतेसह, 34 MBPS वेगाने तुम्हाला रेलटेलकडून स्वस्त दरात डेटा प्लॅन घेता येतात,
2. मोफत वैद्यकीय सुविधा
प्रवासात तब्येत बिघडली? रेल्वेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधा. ट्रेनमध्ये मोफत प्रथमोपचार आणि औषधं मिळतात. टीटीईला सांगा, ते मदत करतील. ही सुविधा सर्व प्रवाशांसाठी आहे.
3. एसी कोचमध्ये बेडरोल
प्रथम एसी, दुसऱ्या एसी किंवा तिसऱ्या एसीत प्रवास करताय? मग घरी बिछाना आणण्याची गरज नाही. रेल्वे मोफत चादर, उशी, ब्लँकेट आणि टॉवेल देते. प्रवास संपल्यावर हे परत करावं लागतं. फक्त गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये यासाठी 25 रुपये आकारले जातात.
4. खानपान सुविधा
घरून जेवण आणलं नाही? काही निवडक ट्रेन, जसं राजधानी किंवा वंदे भारत, तुमच्या सीटवर जेवण पोहोचवतात. ही सुविधा मोफत नाही, तिचा खर्च तिकिटात समाविष्ट असतो.
5. वेटिंग रूम
ट्रेन उशिरा आहे? स्थानकावरील एसी किंवा नॉन-एसी वेटिंग रूममध्ये तिकिट दाखवून आराम करू शकता. काही ठिकाणी यासाठी थोडं शुल्क आकारलं जाऊ शकतं.
6. विमा आणि विशेष सुविधा
रेल्वे प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेते. अपघात झाल्यास 10 लाखांपर्यंतचा विमा मिळतो. यासाठी फक्त 45 पैसे शुल्क तिकिटात जोडलं जातं. तसंच, अपंग, वृद्ध किंवा हालचाल करण्यास असमर्थ प्रवाशांसाठी व्हीलचेअर आणि स्ट्रेचर मोफत उपलब्ध आहे.
प्रवासात सुविधा मिळाली नाही किंवा अडचण आली तर काय कराल ? ऑफलाइन: स्थानक मास्तर, बुकिंग ऑफिस किंवा रिझर्व्हेशन ऑफिसमधील तक्रार पुस्तकात लिहा.
ऑनलाइन: pgportal.gov.in वर तक्रार नोंदवा.
हेल्पलाइन: 9717630982, 011-23386203 किंवा 139 वर संपर्क साधा.