
आजकालच्या डिजिटल युगात आपला बहुतेक वेळ लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनसमोर जातो. ऑफिसचं काम असो, अभ्यास असो किंवा मनोरंजन, स्क्रीनशिवाय आपलं पान हलत नाही. पण या स्क्रीनच्या अतिवापरामुळे आपल्या डोळ्यांवर खूप ताण येतो. डोळ्यातून सारखं पाणी येणं, डोळे कोरडे पडल्यासारखे वाटणं, डोळ्यात तीव्र खाज सुटणं, जळजळ होणं किंवा सुई टोचल्यासारखं वाटणं या समस्या आता अनेकांना जाणवत आहेत.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
जर तुम्हालाही असा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. सुरुवातीला हे त्रास लहान वाटले तरी, पुढे जाऊन ते गंभीर होऊ शकतात. जास्त स्क्रीन टाइम, प्रदूषण, अपुरी झोप किंवा इतर काही कारणांमुळे डोळ्यांच्या या समस्या वाढू शकतात.
अनेकदा या समस्यांवर साधे आणि घरगुती उपाय खूप प्रभावी ठरतात. जास्त स्क्रीन टाइममुळे होणाऱ्या डोळ्यांच्या त्रासावर काही डॉक्टरांनी सुचवलेले सोपे उपाय खालीलप्रमाणे आहेत, जे तुम्हीही वापरून बघू शकता:
1. ’20-20-20′ चा फॉर्म्युला : हा डोळ्यांना आराम देण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी नियम आहे. स्क्रीनवर काम करताना दर 20 मिनिटांनी, 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद नजर स्थिर करा आणि त्यासोबतच किमान 20 वेळा पापण्यांची उघडझाप करा, जेणेकरून डोळे कोरडे होणार नाहीत. लक्षात ठेवा, मोठी माणसं एका वेळी 20-30 मिनिटांपेक्षा जास्त आणि लहान मुलं 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सलग स्क्रीन वापरू नयेत.
2. डोळ्यांसाठी ‘व्हिटॅमिन डी’ : आपल्या शरीराप्रमाणेच डोळ्यांनाही व्हिटॅमिन डी ची गरज असते, जी थंडीच्या दिवसांत किंवा घराबाहेर कमी फिरल्यास अपुरी पडू शकते. यासाठी, सकाळी 9 ते १12 या वेळेत 25-30 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे किंवा फिरणे फायदेशीर ठरते, मात्र थेट सूर्यप्रकाश डोळ्यांवर येणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
3. स्क्रीनचं योग्य अंतर : स्क्रीनसमोर काम करताना डोळ्यांवर ताण येऊ नये यासाठी योग्य अंतर राखणे महत्त्वाचे आहे. तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रीन डोळ्यांपासून किमान ‘एक हातभर’ म्हणजे दीड ते दोन फूट दूर असावा आणि स्क्रीन डोळ्यांच्या पातळीपेक्षा थोडी खाली ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
4. डोळ्यांचा सोपा व्यायाम : डोळ्यांच्या स्नायूंना निरोगी ठेवून ताण कमी करण्यासाठी काही सोपे व्यायाम नियमितपणे करणे महत्त्वाचे आहे. यासाठी, डोळे 10 वेळा वर-खाली, 10 वेळा डावीकडे-उजवीकडे, आणि नंतर 10 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व 10 वेळा उलट दिशेने गोल फिरवा. हा व्यायाम दिवसातून 3 ते 4 वेळा केल्यास डोळ्यांना निश्चितच आराम मिळेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)