अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
लॉरेन्स बिश्नोई गँगने अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडिया पोस्ट आणि एका ऑडिओ क्लिपद्वारे त्यांनी ही माहिती दिली. सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना सोडणार नाही अशी धमकी देत, बिश्नोई गँगने सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. याबाबत एक सोशल मीडिया पोस्ट आणि एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा गंभीर धमकी दिली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असतानाच, बिश्नोई गँगच्या अनिल पंडित आणि त्याचा भाऊ अरमान सोंपू यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. “जो सलमान खानसोबत काम करेल त्याला सोडणार नाही,” अशी थेट धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी अनेकदा समजावूनही टायगर श्रॉफ सलमानसोबत काम करत असल्याने हा गोळीबार केल्याचा दावा गँगने केला आहे.
हा शेवटचा इशारा असून यापुढे कोणालाही सोडणार नाही, असेही धमकीत नमूद केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफला कोणतीही गोळी लागलेली नाही. जुहूच्या पुष्पा पार्क परिसरातून फुटबॉल मॅच खेळून परत येत असताना त्याच्या गाडीवर तीन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केला होता. गोळीबारात टायगर श्रॉफचा चालक जखमी झाला असून त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
