Pune News : पुणेकरांनो… शहरातील ‘हे’ 20 प्रमुख रस्ते 23 जूनपर्यंत वाहतुकीसाठी बंद, कारण काय?
संत ज्ञानोबा आणि संत तुकोबा महाराजांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होणार असल्याने पुण्यातील प्रमुख वीस रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.
पुणे शहरातील प्रमुख रस्ते 23 जूनपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होणार आहेत. दोन्ही पालख्या आज पुण्यात दाखल होत असल्याने पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. भाविकांची गर्दी लक्षात घेता पुणे शहरातील प्रमुख 20 रस्ते आजपासून वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त यांनी केले आहे.
पालखी सोहळ्याचे आगमनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहे. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
हे मार्ग आज वाहतुकीसाठी बंद
आज सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता), डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता – फर्ग्युसन रस्ता), गाडगीळ पुतळा चौक ते स. गो. बर्वे चौक (छत्रपती शिवाजी रस्ता),
आपटे रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता (टिळक चौक ते संत कबीर चौक), शनिपार चौक ते सेवासदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक, गणेश रस्त्यावरील देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, नेहरू रस्त्यावरील रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.