Jayant Narlikar : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
जयंत नारळीकर हे जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञानकथेला आधुनिक चेहरा देणारे लेखक होते. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवडही झाली होती.
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचं आज मंगळवारी, 20 मे रोजी पुण्यात निधन झाले. जयंत नारळीकरांनी त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जयंत नारळीकरांचं निधन हे अल्पशा आजाराने झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळतेय. ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे काळाच्या पडद्याआड गेल्याने विज्ञानाचं विश्व शोकाकुल झाले आहे.
विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये जयंत नारळीकरांची मोठी कारकिर्द असून ती उल्लेखनीय होती. जयंत नारळीकरांच्या निधनाने विज्ञान, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा अदृश्य झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात झाला. नारळीकरांचे वडील विष्णू नारळीकर हे देखील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असून गणितज्ज्ञ आणि वाराणसी इथल्या हिंदू विद्यापिठात गणित शाखेचे प्रमुख होते. जयंत नारळीकर यांचं प्राथमिक शालेय शिक्षण वाराणसीत पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी 1957 मध्ये विज्ञान शाखेतून पदवी मिळवली. आणि पुढील उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिजला गेले असल्याची माहिती आहे.