Chhagan Bhujbal : शेवट चांगला… मुंडेंच्या रिक्त खात्यावर नाराज भुजबळांचं पुनर्वसन, मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी काय म्हणाले?
संपूर्ण ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून भुजबळांची ओळख आहे. छगन भुजबळांनी राज्यात सातत्याने ओबीसी समाजाचं नेतृत्व देखील केलेलं आहे. आता त्यांच्याकडे मुंडेचं खातं सोपवण्यात येणार असून कॅबिनेट मंत्रिपदाची ते आज शपथ घेतील.
धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या खात्यावर नाराज छगन भुजबळ यांचं पुनर्वसन करण्यात येतयं. धनंजय मुंडे यांच्याकडे असणारं अन्न व नागरी पुरवठा खातं छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. छगन भुजबळ आज सकाळी दहा वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा हा राजभवनात संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रचंड बहुमताने आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या यदीत छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी आपली नाराजी देखील कित्येकदा उघडपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर घडलेल्या बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि अन्न व नागरी पुरवठा खातं त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं होतं. मात्र त्याच खात्यावर भुजबळांची वर्णी लागणार असल्याचे दिसतेय.