केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं; हादरवून टाकणारा कांड समोर!
भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या आमिषाने तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या आमिषाने तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, 16 मे रोजी लौकिक फुलकर याने नितीन भुतडा यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. त्याने केंद्र सरकारच्या 42 महामंडळांची यादी, त्यांचे बजेट, वेतन आणि सुविधांची माहिती पाठवून कोणत्याही 3 महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी 20 कोटी 50 लाख रुपये खर्च येईल आणि सुरुवातीला 5 टक्के टोकन रक्कम द्यावी लागेल, असे सांगण्यात आले.
यानंतर 22 आणि 23 मे रोजी गणेश राठोड व विश्वजित राठोड यांनी भुतडा यांची फोनवर आणि भाजप कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. संशय आल्याने नितीन भुतडा यांनी माजी आमदार मदन येरावार यांच्या संपर्क कार्यालयात स्पाय कॅमेरा लावून जाळं रचलं.
30 मे रोजी आरोपींना टोकन रक्कम घेण्यासाठी बोलावण्यात आले. रद्दी भरलेल्या बॅगेवर 50 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. बॅग ताब्यात घेताच संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर भुतडा यांनी तक्रार दाखल केली. ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी लौकिक जगन्नाथ फुलकर, गणेश लालसिंग राठोड आणि विश्वजित सुरेश राठोड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
