नागपूरमधील विधानपरिषदेचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय नेते संदीप जोशी यांनी राजकारणमतून सन्यास घेण्याची घोषणा करत भाजपला मोठा धक्काच दिला आहे. त्यांच्या या निर्णयावरून भाजप समर्थकांनी एकत्र जमून त्यांना हा निर्णय मागे घ्यायचं आवाहन केलं आहे. सध्याची राजकीय संस्कृती आणि निष्ठावंतांवर होणारा अन्याय यावर स्पष्ट मत मांडत संदीप जोशी यांनी पत्र लिहिलं, राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती, मात्र आज सत्तेसाठी होणारे पक्षांतर, संधीसाधूपणा, वाढलेली स्पर्धा ही सामान्य मतदार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कोणीच थांबायला तयार नाही हि वस्तुस्थिती आहे, हे चित्र पाहून आपण स्वतःच थांबावं असा पक्का विचार केला आहे, पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागत मी हा निर्णय जाहीर करतोय असं म्हणत संदीप जोशी यांनी राजकारणातून कायमचा निरोप घेतला आहे.