‘नाना पटोले हे शिमग्यातील सोंग’, शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतर काँग्रेसचा बडा नेता निशाण्यावर
नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे नाना पटोलेंनी म्हटले
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही पाठिंबा देऊ, असं उघडपणे नाना पटोले यांनी म्हटलंय. तर नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंना खोचक सल्ला देत नाना पटोलेंनी पुन्हा जनतेचा विश्वास मिळवणं गरजेचं असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, नाना पटोलेंनी दिलेली ऑफर ही हस्यास्पद असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तर ईडीच्या चाबुकाच्या भितीने कोणी युती सोडण्याचं धाडस करणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर नाना पटोले हे शिमग्यातील सोंग असल्याचं भाष्य आमदार शिखर निकम यांनी केलंय. ‘नाना पटोले यांनी केलेलं विधान म्हणजे एक गंमतीचा भाग म्हणून आपण घेतलं पाहिजे. महायुती म्हणून सगळ्यांनी ही निवडणूक एकत्रितपणे लढवली आहे. तिनही पक्ष एकत्र होते म्हणून मोठा विजय झालाय. त्यामुळे नाना पटोलेंचं हे वक्तव्य गंमतीचा भाग म्हणून बघावं आणि सोडून द्यावं’, असं शिखर निकम यांनी म्हटलंय