Devendra Fadnavis | महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं – मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा

| Updated on: Apr 21, 2026 | 1:10 PM

महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष पेटला आहे. लोकसभेत हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे संसदेत सुरू झालेली लढाई आता थेट रस्त्यावर आली आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष पेटला आहे. लोकसभेत हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे संसदेत सुरू झालेली लढाई आता थेट रस्त्यावर आली आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी आरोप केला की, विरोधक महिला आरक्षणाबाबत सातत्याने दिशाभूल करत असून जनतेसमोर खोटं चित्र उभं करत आहेत. फडणवीस म्हणाले की, 2023 साली हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक घटनादुरुस्ती करण्यात आली होती. “त्या वेळी भाजपकडे बहुमत असल्याने विरोधकांनी विधेयकाला समर्थन दिलं. मात्र आता दोन तृतीयांश बहुमत नसल्यामुळे त्यांची खरी भूमिका समोर आली आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, या विधेयकाला विरोध करून विरोधकांनी नारी शक्ती आणि लोकशाहीचा अपमान केल्याचंही त्यांनी नमूद केलं. “डिलिमिटेशन आणि जनगणनेबाबतही विरोधकांकडून चुकीची माहिती दिली जात आहे. संविधानाने घालून दिलेल्या प्रक्रियेबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे,” असं त्यांनी सांगितलं. फडणवीस यांनी पुढे म्हटलं की, “विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणा मान्य करण्याची तयारी आम्ही दाखवली होती. मात्र त्यांना प्रत्यक्षात महिला आरक्षण लागू करायचं नाही.” “जोपर्यंत संसदेत 33 टक्के महिला पोहोचत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा इशारा देत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, “खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला.

 

Published on: Apr 21, 2026 01:08 PM
Follow Us