Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
गोकुळ निवडणुकीत नाट्यमय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. फेरमतमोजणीनंतर महायुतीला एक जागा मिळाल्याने सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे संख्याबळ १४ वरून १३ पर्यंत घसरले आहे, तर महायुती १२ जागांवर पोहोचली आहे. मतांचा अतिशय कमी फरक असल्याने मतमोजणी केंद्रावर अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. सत्तास्थापनेसाठी सतेज पाटील यांच्या पॅनलकडे बहुमत असले तरी पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालात नाट्यमय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. सुरुवातीच्या कलांनुसार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने १४ जागांवर आघाडी घेतली होती, तर महायुती ११ जागांवर होती. मात्र, फेरमतमोजणीनंतर महायुतीला एक जागा मिळाल्याने हे आकडे बदलले आहेत. आता समविचारी आघाडी १३ जागांवर असून, महायुती १२ जागांवर पोहोचली आहे.
विशेषतः युवराज पाटील आणि शौमिका महाडिक यांच्यासारख्या महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीत मतांचा फरक खूपच कमी होता, काही ठिकाणी ५ ते १५ मतांचा फरक होता. त्यामुळे अनेक जागांवर फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली. दोनदा शौमिका महाडिक आणि तीनदा युवराज पाटील यांची फेरमतमोजणी झाली. याच फेरमतमोजणीनंतर महायुतीचे अमर पाटील विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
यामुळे सतेज पाटील यांच्या पॅनलला सत्तास्थापनेसाठी १३ जागांचे काठावरचे बहुमत मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात गोकुळ निवडणूक ही एक महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या निकालांनंतरही राजकीय घडामोडी सुरू राहण्याची शक्यता आहे.
