नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत… खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!
एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या आमदाराच्या गाडीबाबत जाब विचारल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडितांना गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांकडून शिवीगाळ आणि धमक्या मिळाल्या आहेत. सामान्य नागरिकांना नियमांचे पालन न केल्यास दंड आकारला जातो, मात्र सत्ताधारी नेत्यांना कायद्यातून सूट असल्याचा आरोप या घटनेमुळे समोर आला आहे.
सत्ताधारी आमदारांच्या वाहनांच्या नंबर प्लेट नियमांबाबत प्रश्न विचारणे गुन्हा ठरत आहे का, असा सवाल एका घटनेमुळे उपस्थित झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीला नियमानुसार एचएसआरपी (High Security Registration Plate) नंबर प्लेट नसल्याने पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांनी त्यांना जाब विचारला. यानंतर संतोष पंडित यांना पडळकर यांच्या समर्थकांकडून शिवीगाळ आणि धमक्यांचे कॉल येऊ लागल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारने वाहन चोरी, नकली नंबर प्लेट आणि छेडछाड रोखण्यासाठी एचएसआरपी नंबर प्लेट सक्तीची केली आहे.
ही नंबर प्लेट नसल्यास पहिल्यांदा ५००० रुपये आणि दुसऱ्यांदा १०००० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. १ जुलैपासून महाराष्ट्रातही हे नियम लागू झाले आहेत. सामान्य नागरिकांना लहान-सहान नियमांसाठी दंड आकारला जातो, वाहने जप्त केली जातात. मात्र, नेत्यांच्या वाहनांना नियमबाह्य नंबर प्लेट असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. याउलट, प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना धमक्या दिल्या जात आहेत. आमदार पडळकर यांनी यावर मराठी नंबर प्लेट लावल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, मात्र मुद्दा एचएसआरपीचा असताना ते मराठी भाषेवर बोलत असल्याची टीका होत आहे.
( टीव्ही९ मराठी सदर ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही)
