भाजपमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या ‘त्या’ पत्रानंतर सोमय्या म्हणाले, ‘मला कोणतंही पद नको, तर मला…’
भाजप नेते किरीट सोमय्यांवर पुन्हा एकदा पक्षांतर्गत कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्यांवर पक्षाकडून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने ‘विधानसभा निवडणूक संपर्क प्रमुख’पदी किरीट सोमय्या यांची निवड केली आहे.
भाजपमध्ये लोकशाही आहे, त्यामुळे पक्षांतर्गत चर्चा होते, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. माझं पत्र हा पक्षांतर्गत चर्चेचा विषय होता, तो संपला, असेही त्यांनी म्हटलं आहे. तर मला कार्यकर्ता म्हणून काम करू द्या, पद नको असं पक्षाला सांगितलं असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. तर दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी आपल्याच पक्ष नेतृत्वाला एका पत्र लिहिलं होतं. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पत्रात असं म्हटलं की, ‘आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाचीतरी नियुक्ती करावी.’, असे किरीट सोमय्यांनी सांगितले. ‘मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जवाबदारी मी स्वीकारली होती, माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले तरीही मी जवाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे. या विभानसभा निवडणुकीसाठीही मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतो, करीत राहणार आहे. पण, आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण आणि प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो.’ असे किरीट सोमय्या म्हणाले.