Ladki Bahin Yojana Video : ‘लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार?’ आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं…
महिला दिनाचे औचित्य साधत फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींना पाठवण्यास सुरूवात झाल्याचेही पाहायला मिळत असताना रोहित पवार यांनी महिलांना २१०० रूपये कधी मिळणार असा सवाल केलाय
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून आज या अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना २१०० रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा यंदाच्या अधिवेशनात करणार की नाही? असा सवाल शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला केलाय. तर रोहित पवार यांनी लाडक्या बहिणींसंदर्भात केलेल्या सवालावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर देताना लाडक्या बहिणीची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असं म्हटलं आहे. ‘निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये देणार असं सरकारने सांगितलं होतं. तर तुम्ही या अधिवेशनात लाडक्या बहिणींसाठी २१०० रूपये करणार आहात का? की नाही?’, असा सवाल रोहित पवार यांनी सभागृहात केला. यावर ‘महायुती सरकारने ही महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. २१०० रूपयांबाबतचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल. महिलांच्या आयुष्यातील हा आनंद असाच राहणार आहे. लाडक्या बहिणीची फसवणूक होणार नाही, याची दक्षता महायुतीचं सरकार निश्चितपणे घेईल’, असं आदिती तटकरे म्हणाल्या. बघा काय म्हणाल्या?