भुजबळांनी वारसा वादाची वात पुन्हा पेटवली?
छगन भुजबळ यांच्या विधानाने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या वारसा हक्कावरून मुंडे बंधू-भगिनींमधील जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. भुजबळांनी धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडेंचा वारसा सांभाळण्याचे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरीमुळेही चर्चांना उधाण आले आहे.
छगन भुजबळ यांनी अलीकडेच दिलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे कुटुंबातील वारसा वादाची चर्चा सुरू झाली आहे. भुजबळांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून, “गोपीनाथ मुंडेंचे वारसदार म्हणून गोरगरीब जनतेची सेवा करा”, असे म्हटले होते. यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत, कारण याच वारसा वादातून धनंजय मुंडे पूर्वी पक्षाबाहेर पडले होते. सध्या महायुतीत मुंडे बंधू-भगिनी एकत्र आले असताना, भुजबळांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा त्यांच्यातील राजकीय वारसा हक्काचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पंकजा मुंडे यांनी या भाषणावर प्रतिक्रिया देण्यास नकार देत, आपण भाषण पाहिले नसल्याचे सांगितले. भुजबळ हे पंकजा मुंडे यांना दूर करून धनंजय मुंडे यांच्या पाठीशी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय पाठबळ उभे करत आहेत का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

