मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला दोन दिवस झालेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलंय. मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती खालवल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधत मनोज जरांगे पाटील हे १७ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैद्रराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा… मनोज जरांगे पाटील यांची मागणी स्पष्ट आहे. मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा थेट इशारा देत शेवटचं अल्टिमेटम दिलंय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला दोन दिवस झाले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.