Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मनोज जरांगे पाटील यांच्या १९ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ५ हजार आंदोलकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण पोलिसांनी दिले आहे. मात्र, जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम असून, ते १५ तारखेला जालन्यातून मुंबईकडे निघणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ५ हजार आंदोलकांना परवानगी मिळावी यासाठी जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता, तसेच अटी व शर्तींचे पालन करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते, असे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली.
आझाद मैदान परिसरातील रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि शासकीय कार्यालयांमुळे मोठ्या गर्दीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर आणि रुग्णसेवेवर होऊ शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेला तणाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. यापूर्वी ओबीसी मोर्चाच्या आंदोलनालाही याच धर्तीवर परवानगी नाकारण्यात आली होती.
जरांगे पाटील १५ तारखेला जालन्यातील अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार असून, १९ तारखेला मुंबईत पोहोचण्याची त्यांची योजना आहे. मात्र, परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही ते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Sep 13, 2026 03:49 PM
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक

