'मायमराठी'ची अवहेलना थांबेना... 'कुठंही तर करा, वाकडं होणार नाही', 82 वर्षीय ज्येष्ठाला हिंदी बोलण्यास पाडलं भाग

‘मायमराठी’ची अवहेलना थांबेना… ‘कुठंही तर करा, वाकडं होणार नाही’, 82 वर्षीय ज्येष्ठाला हिंदी बोलण्यास पाडलं भाग

| Updated on: Feb 05, 2025 | 1:08 PM

डोंबिवलीमधील 82 वर्षांच्या वृद्ध नागरिकाला हिंदीत बोलण्यास भाग पाडण्यात आलं. मुंबईतील महापेक्स प्रदर्शनात हा संतापजनक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही भागात मराठी आणि अमराठी भाषिक नागरिकांमधील वाद चांगलाच रंगताना दिसतोय. अशातच आता डोंबिवलीमध्येही असाच प्रकार घडल्याचे पाहायला मिळालंय. डोंबिवलीमधील 82 वर्षांच्या वृद्ध नागरिकाला हिंदीत बोलण्यास भाग पाडण्यात आलं. मुंबईतील महापेक्स प्रदर्शनात हा संतापजनक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर ‘ तुम्ही कुठेही तक्रार करा, आमचं काहीच वाकडं होणार नाही’ असं म्हणत महापेक्स प्रदर्शनातील अधिकाऱ्याने त्या ज्येष्ठ नागरिकासोबत अरेरावी केली. दरम्यान, याप्रकरणी संबिधत ज्येष्ठ अधिकाऱ्याने मुंबई जीपीओच्या फिलाटेलिक ब्युरोकडे तक्रार केली आहे. माहितीनुसार, डोंबिवलीत राहणारे रमेश पारखे हे 82 वर्षांचे गृहस्थ 25 तारखेला मुंबईतील वर्ल्ड ड्रेड सेंटरमध्ये गेले होते. भारत सरकारच्या पोस्ट अँड टेलिग्राफ जीपीओतर्फे आयोजित एका प्रदर्शनासाठी ते पोहोचले. त्यांना काही फिलाटेलीक साहित्य हवं होतं. मला अमुक-अमुक साहित्य हवंय असं सांगत पारखे यांनी मराठीत मागणी केली. मात्र त्या काऊंटरवरील अधिकाऱ्याचा पवित्रा काही वेगळाच होता. तुम्ही जर हिंदीत बोलला नाहीत, तर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, तुम्हाला हिंदीत बोलावंच लागेल, असे त्या अधिकाऱ्याने सुनावले. एवढंच नव्हे तर तुम्ही जा, कुठेही जा, तक्रार करा, आमचं काही बिघडणार नाही, अशी उद्धट वागणूक त्या अधिकाऱ्याची होती, असे पारखे यांनी सांगितलं.

Published on: Feb 05, 2025 01:08 PM