Kolhapur : स्मशानभूमीत नग्न दाम्पत्याकडून अघोरी पूजा, चिता विस्कटून काळी बाहुली, टाचण्या अन्… CCTV मध्ये जे दिसलं त्यानं कोल्हापूर हादरलं
उदगाव ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही पाहिले असता यामध्ये महिला, पुरुष वेगवेगळ्यावेळी विशेषत: अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार अशा दिवशी भरदिवसा नग्न होवून अघोरी पूजा करीत असल्याचे समोर आले आहे. यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरातील जयसिंगपूरमधील उदगाव वैकुंठधाम स्मानभूमीतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयसिंगपूरमधील उदगाव वैकुंठधाम स्मानभूमीमध्ये एक आघोरी प्रकार करण्यात आल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. एक दाम्प्त्य उदगाव वैकुंठधाम स्मानभूमीमध्ये नग्न आवस्थेत अघोरी पूजा करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या प्रकारासंदर्भात उदगावाचे सरपंच सलीम पेंढारी यांनी बोलताना नेमकं काय घडलं याची माहिती दिली. जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनासाठी आले होते. मात्र तेव्हा तिथे चितेची राख नव्हती. तर काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केल्याचे पाहायला मिळाले. याची माहिती त्या कुटुंबियांनी ग्रामपंचायतीत दिली. यानंतर ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.