Narayan Rane | नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? प्रीतम मुंडेंच्या नावाचीही जोरदार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. अशावेळी आता महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत. त्यात खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील एका नेत्याचं केंद्रीय मंत्रिपद जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.

नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार?

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी दिली आहे. त्यामागे नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात भाजपने रान पेटवलं असताना नारायण राणे यांना केंद्रात स्थान देत महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन शिवसेनेला जेरीस आणण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राणे हे बराच काळ शिवसेनेत होते. तसंच त्यांना मुंबई महापालिकेतील खाच-खळगे माहिती आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा उपयोग होऊ शकतो, असा भाजपचा कयास असेल असंही त्यांनी म्हटलंय.