ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत! नारायण राणेंची खरपूस टीका
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाची घोषणा केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाकरे डिप्रेशनमध्ये असून त्यांची शिवसेना आता नावालाच उरली आहे, असे राणे म्हणाले. महायुती या निवडणुकीत १००% यश मिळवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीच्या जागावाटपाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. “उद्धव ठाकरे आता डिप्रेशनमध्ये गेले आहेत,” असे म्हणत राणेंनी ठाकरेंच्या राजकीय भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राणेंनी स्पष्ट केले की, महायुती सिंधुदुर्गमध्ये १००% यश मिळवणार असून, विरोधी पक्षांना लढण्यासाठी कोणीही शिल्लक राहिलेले नाही. त्यांनी ठाकरेंच्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता गमावण्यावरही भाष्य केले, “आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवल्यामुळे नफा तोटा काय होतो, याचा अनुभव उद्धव ठाकरेंना आला आहे.” संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत.

