Nikhil Wagle Attack | वागळे, सरोदे यांच्या पाठीशी कॉंग्रेस ठाम उभी, विधीमंडळात मुद्दा मांडणार
पुणे येथे 'निर्भय बनो' सभेसाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर परवा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जीव घेणा हल्ला केला. या प्रकरणी सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल केला आहे. तसेच पत्रकार निखिल वागळे यांच्यावर नेमका का गुन्हा दाखल केला आहे हे समजू शकले नसल्याचे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे. आता या सामाजिक कार्यकर्त्यांच्या बाजूने कॉंग्रेस मदतीला आली असून विधीमंडळात यावर आवाज उठवू असे कॉंग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे.
पुणे | 11 फेब्रुवारी 2024 : ‘निर्भय बनो’ सभेसाठी आलेल्या पत्रकार ज्येष्ठ निखिल वागळे यांच्या गाडीवर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रकार पुण्यात शुक्रवारी घडला. या प्रकरणात सभेच्या आयोजकांसह दोनशे जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कॉंग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांची भेट घेऊन कॉंग्रेस पक्ष या प्रकरणी विधीमंडळात आवाज उठविणार असल्याचे आश्वस्थ केले. या प्रकरणात ही सभा उधळण्यात येणार असल्याची धमकी जाहीरपणे देणाऱ्या भाजपाच्या गुंडांवर पुणे पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल यावेळी ॲड. असीम सरोदे यांनी केला आहे. तर पुणे शहर आता सुसंस्कृत शहर राहीलेले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. एखाद्या भोजपूरी सिनेमा सारखे दृश्य पुण्याच्या रस्त्यावर काल दिसत होते. जर भाजपाला खात्री आहे ते 400 पार जाणार आहेत तर आम्हा चार जणांना ते का एवढं घाबरत आहेत असाही सवाल विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे वकील असीम सरोदे यांनी यावेळी सांगितले.