Ravindra Dhangekar Video : ‘निर्णय घेणं कठीण, पक्ष सोडताना दुःख पण…’, रवींद्र धंगेकरांचं ठरलं, शिवसेनेचं धनुष्यबाण घेणार हाती
रवींद्र धंगेकर हे पक्षाला रामराम करून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. अंतर्गत गटबाजीची चर्चा काँग्रेसच्या गोटात होती. या सर्व पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होत. अशातच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र धंगेकर यांना पक्षात येण्यासाठी खुली ऑफर दिली होती. यानंतर रवींद्र धंगेकर नेमका कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र अखेर आज काँग्रेसच्या माजी आमदाराने पक्षाला रामराम ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून आज संध्याकाळी 7 वाजता धंगेकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली. दरम्यान, काँग्रेस सोडताना खूप दुःख होतंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. ‘कुठलाही निर्णय घेणं हे प्रचंड कठीण असतं. या पक्षासोबत मी गेली 10-12 वर्ष काम करतोय. पक्षातील सर्वांशी कौटुंबिक नाती निर्माण होत असतात. पक्ष सोडताना खूप दुःख होतंय, मीही माणूसच आहे. मतदारांशीही मी चर्चा केली, आमच्याकडे काम कोण करणार, असा सर्वांचा सवाल होता. लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांचं काम करू शकत नाही’, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.