Vikram Kakade | अर्ज भरला, पण आता अडथळा! विक्रम काकडेंना निवडणुकीआधीच मोठा झटका

Vikram Kakade | अर्ज भरला, पण आता अडथळा! विक्रम काकडेंना निवडणुकीआधीच मोठा झटका

| Updated on: Jun 02, 2026 | 1:41 PM

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडण्यासाठी पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून पुणे मतदारसंघासाठी श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अर्ज छाननी प्रक्रियेच्या सुरुवातीलाच हा आक्षेप नोंदवण्यात आल्याने विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, नेमक्या कोणत्या तांत्रिक किंवा कायदेशीर कारणावरून आक्षेप घेण्यात आला आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरून यापूर्वीही राजकीय चर्चांना उधाण आले होते. नुकतेच संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे हे दोघेही पक्ष कार्यालयात उपस्थित असल्याने उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

त्यानंतर विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सुनील टिंगरे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. काही समर्थकांनी राजीनामेही दिल्याची चर्चा होती. आता त्यातच शरद पवार गटाने उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपामुळे या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी या आक्षेपावर काय निर्णय घेतात, विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरतो की बाद होतो, याकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचेही लक्ष लागले आहे.

Published on: Jun 02, 2026 1:41 PM
Follow Us