Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात पोलीसच सुरक्षित नाही... 4 मद्यपींकडून बेदम मारहाण, CCTV फुटेज पाहून तुम्हालाही बसेल धक्का

पुण्यात पोलीसच सुरक्षित नाही… 4 मद्यपींकडून बेदम मारहाण, CCTV फुटेज पाहून तुम्हालाही बसेल धक्का

| Updated on: Feb 19, 2025 | 4:52 PM

घरी परत निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चार मद्यपींकडून बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी मद्यपींनी पोलिसाचा मोबाईल हिसकावला. संबंधित पोलिसाने याबाबत चतुःश्रृंगी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पुण्यात पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरी परत निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चार मद्यपींकडून बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी मद्यपींनी पोलिसाचा मोबाईल हिसकावला. संबंधित पोलिसाने याबाबत चतुःश्रृंगी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर मारहाण करणाऱ्या मद्यपींवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी चंद्रकांत जाधव (वय.42, रा. रामोशीवाडी) यांनी फिर्याद दिली असता पोलिसांनी रुपेश मांजरेकर, अनिकेत घोडके आणि अभिजित डोंगरे या तिघांना अटक केली आहे. तर त्यांच्या अन्य एका साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलीस चंद्रकांत जाधव यांना मारहाण करण्यात आल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत जाधव हे सहकारनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते रामोशीवाडी एस. बी. रोड परिसरात ते वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि. 13) मध्यरात्री आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन संपवून घरी परत निघाले होते. रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता, चौघेजण त्यांना रस्त्यावर एका रिक्षात मध्यप्राशन करताना दिसले. ते चौघे गोंधळ घालत होते. जाधव यांनी त्यांना हटकले आणि गोंधळ घालत असल्याचा जाब विचारला. त्याचा त्यांना राग आला. त्यांनी जाधव यांना धमकावत आम्हाला माहिती आहे तू पोलिस आहेस, परंतू तू इथला पोलीस नाहीस त्यामुळे तू आम्हाला शिकवू नको, असे म्हणत दम भरला. त्यानंतर चौघांनी जाधव यांना रिक्षात डांबून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

Published on: Feb 19, 2025 04:52 PM